

बुधगाव : गावात अस्वच्छ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने मिरज पंचायत समितीने कवलापूर (ता. मिरज) ग्रामपंचायतीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिसीनंतर ग्रामपंचायतीने दुरुस्ती व स्वच्छता कामाचे कारण पुढे करत १० दिवसांपासून पाणीपुरवठाच बंद ठेवला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांवर तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. आगामी दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
अनेक दिवसांपासून कवलापूर गावात गढूळ पाणी पुरवले जात होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली असता ते पिण्यास अयोग्य असल्याचे अहवालात स्पष्ट झाले. तसेच बुधगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिनचा वापर केला जात नसल्याचे व तेथील नोंदवही (रजिस्टर) गायब असल्याचे समोर आले. याबाबत सामाजिक कार्यकर्ते गजानन यादव यांनी पंचायत समितीकडे तक्रार दाखल केली होती.