

सांगली/मुंबई : कवलापूर (ता. मिरज) येथील प्रस्तावित विमानतळासाठी जागेची पाहणी करून तातडीने अहवाल सादर करा, अशा सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या.
जिल्ह्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विमानतळ उभारणीच्या प्रश्नावर मुंबईत मंगळवारी उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुहास बाबर, आमदार विश्वजित कदम यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडचे पदाधिकारी, त्याशिवाय आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे हे ऑनलाईन बैठकीस उपस्थित होते. दरम्यान या विमानतळासंदर्भात पुढील बैठक अहवाल आल्यानंतर 7 ऑक्टोबररोजी होणार आहे.
बैठकीत मंत्री सामंत यांनी कवलापूर परिसर विमानतळ उभारणीसाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट केले. विमानतळासाठी अतिरिक्त जमिनीची गरज असल्यास सरकार ती अधिग्रहित करून विमानतळ प्रकल्पासाठी उपलब्ध करून देईल, असे आश्वासन त्यांनी दिले. खासदार पाटील म्हणाले, कवलापूर येथील विमानतळ होणे आवश्यक आहे. त्यासाठी अगोदर अहवाल सादर करावा. निधीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू.
कवलापूर विमानळाच्या पाहणीसाठी पथक येणार
दरम्यान, कवलापूर येथील विमानतळाच्या जागेची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटीचे पथक चार दिवसांत सांगलीला येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली. यासाठी साडेसहा हेक्टर जादा जमिनीची गरज आहे. या ठिकाणाहून प्रवासी आणि माल वाहतूक सुरू करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. कार्गो सेवा सुरू झाल्यास येथील शेतीमालाला आंतराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.