

ईश्वरपूर : महिलांमधील उद्योजकीय क्षमता ओळखून त्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे ही आजच्या काळाची गरज आहे. दैनिक ‘पुढारी कस्तुरी क्लब’च्या माध्यमातून महिलांना उत्तम व्यासपीठ मिळत असून, अशा उपक्रमांमुळे महिला उद्योजकांना स्वतःच्या उत्पादनांची ओळख निर्माण करण्यासोबतच व्यवसायवृद्धीची संधी मिळते, असे प्रतिपादन व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या संचालिका हर्षदा राहुल महाडिक यांनी केले.
दैनिक पुढारी कस्तुरी क्लब, ईश्वरपूर यांच्यावतीने राजारामबापू नाट्यगृहाच्या तळमजल्यावरील सभागृहात आयोजित तीनदिवसीय ‘कस्तुरी एक्झिबिशन अँड एक्स्पो’च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान आयोजित या दिवाळी एक्स्पोमध्ये महिला उद्योजक, गृहउद्योग आणि विविध व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे.
सातारा विमेन्स एज्युकेशन सोसायटी व कस्तुरी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा रूपाली खंडेराव जाधव म्हणाल्या, कस्तुरी क्लबच्या उपक्रमांमुळे महिलांच्या व्यावसायिक कौशल्यांना वाव मिळत आहे. अशा प्रदर्शनांमुळे उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचून महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि आर्थिक स्वावलंबनाला गती मिळते.
‘इरेव्हो नील’ इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण
एक्स्पोचे विशेष आकर्षण ठरलेल्या इरेव्हो इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नवीन ‘इरेव्हो नील’ इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. कंपनीच्या संचालिका मनीषा अमोल पोवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आनंदराव महापुरे यांनी या पर्यावरणपूरक व किफायतशीर स्कूटरची वैशिष्ट्ये सांगितली. पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि ग्राहकांच्या दैनंदिन प्रवासासाठी उपयुक्त इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्यावर कंपनीचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्घाटनप्रसंगी नगरसेविका अनिता कपिल ओसवाल, रूपाली खंडेराव जाधव, हर्षदा राहुल महाडिक, मनीषा अमोल पोवार, सचिन आनंदराव महापुरे आणि रघुनाथ बागडी उपस्थित होते. प्रा. विजय लोहार यांनी सूत्रसंचालन केले. मान्यवरांनी विविध स्टॉल्सना भेट देऊन उत्पादनांची पाहणी केली.
साड्या, दागिने, लोणची ते गृहोपयोगी वस्तू
‘सशक्त महिला... समृद्ध उद्योजकता...’ या संकल्पनेवर आधारित या एक्स्पोमध्ये हिंदवी बचत गटाची लोणची, माहेश्वरी साड्या, लखनवी वस्त्रे, आभूषण ज्वेलरी, आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधने आणि गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्स ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच चालुक्य फिटनेस क्लब, कॅफे ब्लू रेस्टॉरंट, प्रवीण टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि जिओ मनी क्रिएशन यांनीही सहभाग नोंदवला आहे.
२६ ऑक्टोबरपर्यंत आयोजन
नानासाहेब महाडिक मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हे या एक्स्पोचे मुख्य प्रायोजक असून सातारा विमेन्स एज्युकेशन सोसायटी आणि कस्तुरी चॅरिटेबल ट्रस्ट सहप्रायोजक आहेत. हा एक्स्पो २६ ऑक्टोबरपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत खुला राहणार असून नागरिकांनी भेट देऊन महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.