

मिरज : विवाहितेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी आरग (ता. मिरज) येथील स्मशानभूमीत मृतदेह जाळल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कृष्णा सहदेव पाटील यांनी प्रकाश भीमाप्पा हेळवी (वय 46), शानूर सदाशिव हेळवी (दोघे रा. नदीगुडकैत्र, ता. हुक्केरी) आणि कल्लाप्पा मलाप्पा हेळवी (वय 40, रा. मोरंब, ता. रायबाग, जि. बेळगाव) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. याबाबत कर्नाटकातील यमकनमर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, तो आता मिरज ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
सत्यव्वा संतोष हेळवी (वय 24, रा. हनबरहट्टी, ता. रायबाग, जि. बेळगाव) हिचा संतोष हेळवी याच्यासोबत विवाह झाला होता. परंतु त्यानंतर ती पळून जाऊन कृष्णा पाटील याच्यासोबत राहत होती. याचा राग संशयितांच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी सत्यव्वा हिला दि. 12 मार्च ते दि. 21 मार्चदरम्यान पळवून नेऊन तिचा खून केला. मृतदेह मिरज तालुक्यातील आरग येथील स्मशानभूमीत आणून तिच्यावर अंत्यसंस्कार करून खुनाचा पुरावा नष्ट केला होता. याबाबत कृष्णा पाटील यांच्या फिर्यादीनुसार कर्नाटकातील यमकनमर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता कर्नाटक न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
दरम्यान, खुनाची घटना मिरज तालुक्यात घडली असल्याने हा गुन्हा बेळगाव पोलिस अधीक्षकांनी सांगली पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे वर्ग केला होता. त्यानुसार आता खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.