जत शहर/बिळूर : तालुक्यातील बिळूर येथील तरुणाने कर्नाटकातील अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने विवाह केला. त्यातून ती गर्भवती राहिली. तिने बाळाला जन्म दिला; पण सात महिन्यांच्या या बाळाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी बेळगाव जिल्हा मुलांचे संरक्षण विभागाच्या कायदा परीक्षण अधिकारी रुखमादेवी बुदीगोप यांनी बिळूरच्या तरुणाविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानंतर हा गुन्हा जत पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
संशयित गोडेश अण्णाप्पा कामगौंड (वय 23, रा. बिळूर, ता. जत) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह अन्य जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. बिळूर येथील गोडेश कामगौंड याचा कर्नाटकातील अल्पवयीन मुलीशी मार्च 2024 मध्ये विवाह करण्यात आला. त्यानंतर गोडेश याने ती अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यातून पीडिता गर्भवती राहिली.
1 जानेवारी 2025 रोजी तिने मुलाला जन्म दिला. मात्र सात महिन्यांनंतर त्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. बेळगाव येथील जिल्हा मुलांचे संरक्षण विभागाच्या कायदा परीक्षण अधिकारी बुदीगोप यांनी, मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिच्याशी विवाह करून तिला गर्भवती केल्याने कर्नाटकात बिळूरच्या तरुणाविरोधात फिर्याद दिली. त्यानंतर हा गुन्हा जत पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
याप्रकरणी पतीसह अन्य जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता तसेच बाललैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक बिराप्पा लातुरे म्हणाले, या प्रकरणामध्ये अन्य काही संशयितांची चौकशी सुरू आहे.