सांगली : पुढारी वृत्तसेवा
सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी वाढू लागली की शेरीनाल्याचे पाणी मागे सरते आणि कर्नाळ रोड, जुना बुधगाव रस्ता पाण्याखाली येतो. यावेळच्या पुरात 33 फुटाला या दोन्ही रस्त्यांवर पाणी आले होते. पण, पुढच्या पावसाळ्यातील पुरावेळी पाणीपातळी 40 फुटांपर्यंत येईपर्यंत कर्नाळ रस्ता पाण्याखाली जाणार नाही. कारण हा रस्ता आणि शेरीनाला पूल 7.80 फुटाने उंच करण्यात येणार आहे.
सांगलीत कृष्णेची इशारा पातळी 40 फुटाला आहे. मात्र, आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी 30 फुटांपर्यंत आली की पाणी पूरक्षेत्रात नागरी वस्तीजवळ येण्यास सुरुवात होते. सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांच्या दारात पाणी येते. पाणीपातळी जसजसे वाढत जाईल तसे नागरिकांचे स्थलांतर सुरू होते. दरम्यान, पाणी 33 फुटांपर्यंत गेले की पाणी शेरीनाल्यातून मागे सरकत जाते. यावेळी 25 जूनच्या सायंकाळी कर्नाळ रस्त्यावर शेरीनाला पुलाजवळ पाणी येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर रात्रीत या रस्त्यावर पाणी आले. रस्ता वाहतुकीस बंद झाला. यावेळी हा रस्ता तेरा दिवस पाण्याखाली होता.
कर्नाळ रोड पोलिस चौकी ते शिवशंभो चौकापर्यंतचा रस्ता तेहतीस-चौतीस फुटालाच पाण्याखाली येत असल्याने हा रस्ता, या रस्त्यावरील शेरीनाला पूल उंचावण्याची मागणी पुढे आली होती. त्यानुसार कामाला मंजुरी मिळाली. सुमारे 8 कोटी रुपयांचा निधीही मंजूर आहे. निविदा प्रक्रियाही झालेली आहे. कार्यारंभ आदेशही निघालेला आहे. पावसाळा संपला की कामाला सुरुवात होईल. हा रस्ता आणि पुलाची उंची 2.40 मीटरने म्हणजे 7.80 फुटाने वाढणार आहे. त्यामुळे सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी 40 फुटांवर येईपर्यंत हा रस्ता पाण्याखाली जाणार नाही. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला राहील.
पूरपट्ट्यातील रस्त्यांची लांबी 110 किलोमीटर आहे. जोराचा पाऊस व महापुरात या रस्त्यांची अवस्था बिकट होते. रस्ते वाहून जातात. मोठाले खड्डे पडतात. पावसाबरोबरच कामाचा सुमार दर्जाही त्यास कारणीभूत आहे. दरम्यान, खराब झालेल्या रस्त्यांचे पॅचवर्क, डांबरीकरण केले तरी पुढील पावसाळा, महापुरात पुन्हा हे रस्ते खराब होतात. पुन्हा या रस्त्यांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होतो. त्यावर उपाय म्हणून महापालिका क्षेत्रातील पूरपट्ट्यातील रस्ते काँक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव पुढे आला. तोे शासनस्तरावर पाठवलेला आहे. मात्र, त्याचे पुढे काय झाले, हे समजू शकलेले नाही.
सांगली : पुराच्या पाण्याखाली गेलेला कर्नाळ रस्ता तेरा दिवसानंतर वाहतुकीस खुला झाला. (छाया : सचिन सुतार)