

आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील तोडकर मळ्याकडे जाणार्या रस्त्यालगत सदाशिव दळवी यांच्या शेतातील उसात मंगळवार, दि. 23 रोजी रात्री बिबट्याची तीन पिले आढळून आली. येथील शेतकर्यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली.
कारंदवाडी येथील शेतात ऊसतोड सुरू आहे. मंगळवारी या परिसरात बिबट्याची तीन नवजात पिले आढळून आली. याबाबतची माहिती मिळताच सांगली वन विभागाचे अजित पाटील, वनमजूर इकबाल पठाण व पथक कारंदवाडीत दाखल झाले. परंतु घटनास्थळ कारंदवाडी हद्दीत असल्याने शिराळा येथून वन्यजीव पथक बोलावण्यात आले. वनरक्षक भिवा कोळेकर, युनूस मणेर व गौरव गायकवाड यांच्यासह पथक तसेच कारंदवाडीचे पोलिस पाटील अमित जाधव घटनास्थळी दाखल झाले. कोळेकर यांनी या तीनही पिलांना ताब्यात घेऊन आष्टा येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. येथे पशुधन पर्यवेक्षक मुकुंद वाटेगावकर यांनी या पिलांची तपासणी करून त्यांना अन्न व औषधोपचार दिले. यानंतर पिले जेथे सापडली, तेथेच सुरक्षितपणे सोडण्यात आली. दरम्यान, सांगली येथील सहायक उप वनसंरक्षक कांबळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.