

ईश्वरपूर : ईश्वरपूर ते नरसिंहपूर रस्त्यावरील बहे (ता. वाळवा) पुलानजिक गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला ईश्वरपूर पोलिस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी अटक केली. विशाल वैजीनाथ करनुरे (वय 21 रा. शनिवार पेठ, कराड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून अडीच किलो गांजा, दुचाकी असा सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी विशाल याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, ईश्वरपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाला शुक्रवारी बहे पुलानजिक एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बहे पूल परिसरात पथकाने सापळा लावला.
सायंकाळी सहाच्या सुमारास विशाल हा पुलाच्या दक्षिणेकडील बाजूस कच्च्या रस्त्यावर पिशवी घेऊन संशयितरीत्या थांबला होता. पोलिस तेथे जाताच तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्या पिशवीत 62 हजार 850 रूपये किंमतीचा 2 किलो 514 ग्रॅम गांजा सापडला. गुन्ह्यात वापरलेली 60 हजार रुपये किंमतीची दुचाकी व गांजा असा एकूण 1 लाख 22 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव, हवालदार कुबेर खोत, विशाल पांगे, अमोल सावंत, शशिकांत शिंदे, दीपक घस्ते, चंद्रकांत वंजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.