Kalpanaraje Bhosale : शिवरायांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केल्यास खांडोळ्या होतील

छत्रपती कल्पनाराजे भोसले; सांगलीत विविध पक्ष, संघटनांचा महामोर्चा
Kalpanaraje Bhosale
Kalpanaraje Bhosale
Published on
Updated on

सांगली : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करून त्यांचा देदीप्यमान इतिहास पुसण्याचे काम सुरू आहे. पण तेे कधीच शक्य होणार नाही. फक्त पुस्तकातून नकाशा काढण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सर्वत्र आंदोलन उभे राहिले; इतिहास बदलण्याचा प्रयत्न केल्यास खांडोळ्या होतील, असा इशारा छत्रपती कल्पनाराजे भोसले (सातारा) यांनी सांगलीत दिला.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटविल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सांगलीत तळपत्या उन्हात मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चा काढण्यात आला. येथील स्टेशन चौकातून महामोर्चास सुरुवात झाली, तर मारुती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर समारोप झाला. यावेळी आयोजित सभेत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले बोलत होत्या.

खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, तसेच सरदार घराण्यांचे वंशज प्रमुख उपस्थित होते. याठिकाणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदन स्वीकारले. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान, मराठा क्रांती मोर्चा, शिवसेना, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी पक्ष, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष यांच्यासह अनेक पक्ष, संघटनांनी मोर्चाचे संयोजन केले होते.

छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अतिशय देदीप्यमान आहे. पण दुर्दैवाने तो पुसण्याचा प्रयत्न होत आहे. देशापुढे आज अनेक सामाजिक प्रश्न असताना, असे समाजाला वेगळे वळण द्यायचे काय कारण आहे? एनसीईआरटीने पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा काढण्याच्या निर्णयाविरोधात खासदार छत्रपती उदयनराजे दिल्लीदरबारी आवाज उठवतील. केंद्र सरकारला त्याची दखल घ्यावी लागेल.

तळपत्या उन्हात निघालेल्या या मोर्च्यात शेकडो शिवप्रेमी सहभागी होते. भगवे फेटे घातलेल्या शिवपाईकांच्या घोषणांनी अवघा परिसर दणाणून गेला. यावेळी सरदार घराण्यांचे वंशज बहिर्जी घोरपडे, रणवीरसिंह बाळ निंबाळकर, जयाजीराव मोहिते, दादासाहेब नाईक, आनंदराव काशीद, आशिष शिंदे, सिध्दार्थ कंक, संदेश देशपांडे, सयाजीराव गुजर, शैलेश वारखडे, अनुज गोळे, रायबा मालुसरे, नितीन मालुसरे, युवराज आदित्यराजे पटवर्धन, राम नारायण रोड मराठा, भरत अमदापुरे आदी उपस्थित होते.

शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले, भाजपचे पृथ्वीराज पाटील, काँग्रेसचे डॉ. जितेश कदम, श्री गणपती पंचायतन संस्थानचे आदित्यराजे पटवर्धन, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, काँग्रेसचे युवा नेते मंगेश चव्हाण, शिवसेना (उबाठा)चे शंभुराज काटकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवराज गायकवाड, शेखर माने, अभिजित हारगे, आशा पाटील, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news