

सांगली : महापालिकेची उद्याने, हरितक्षेत्रे, आयलँड देखभाल करणार्या कंत्राटी मजूर, कर्मचार्यांची संबंधित ठेकेदार पिळवणूक करीत आहे. त्यांना आठ महिन्यांपासून पगार दिलेला नाही. त्यांच्या पीएफ, कामगार विमा व अन्य शासकीय रकमा भरलेल्या नाहीत, असा आरोप कंत्राटी व मानधन कर्मचारी संघटनेचे डॉ. कैलास पाटील यांनी केला. महापालिकेसमोर निदर्शने केली. 8 जुलैपासून धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
डॉ. कैलास पाटील म्हणाले, महापालिकेने बागमजूर व सुरक्षा रक्षक पुरवण्याचा ठेका दिला आहे. सुमारे 100 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. नियमानुसार पगार संबंधित कर्मचार्यांच्या बँक खात्यावर जमा करायचा आहे, मात्र ठेकेदाराने तसे न करता या कामागारांना दोन-पाच हजार रुपये अॅडव्हान्स रोखीने देत त्यांचा पूर्ण पगार देण्याचे टाळले आहे. या कर्मचार्यांचा पी.एफ., कामगार विम्याची रक्कम ठेकेदाराने भरलेली नाही. ही रक्कम भरल्याशिवाय ठेकेदाराचे बिल अदा करायचे नाही, असे निविदेच्या अटी-शर्तीमध्ये आहे. तरीही अधिकार्यांनी ठेकेदाराला काही बिले दिल्याच्या तक्रारी आहेत.
या ठेक्याच्या निविदा प्रक्रियेची चौकशी व्हावी. निविदेतील काही साहित्य तसेच कर्मचार्यांना द्यायचे मोबाईल व अन्य बाबी ठेकेदाराने दिलेल्या नाहीत. याचीही चौकशी झाली पाहिजे. कंत्राटी बागमजूर, कर्मचार्यांचा थकीत पगार 7 जुलैपूर्वी त्यांच्या खात्यात भरण्यास ठेकेदारास भाग पाडावे. पीएफ, कामगार विमा, व्यवसाय कर, कामगार कल्याण निधी व ठेकेदारासोबत करारात ठरलेल्या अटी-शर्तीनुसार सर्व देणी द्यावीत, अशी मागणी डॉ. पाटील यांनी केली. निवेदनावर आकाश माने, देवजी साळुंखे, अॅड. सुनिता पाटील, विनायक कारंडे, अफजल मोमीन, कैलास आवळे, दादासाहेब जानकर, कमलेश्वर डोंबाळे यांची स्वाक्षरी आहे.