

रजाअली पिरजादे
कडेगाव शहर : कडेगाव तालुक्यात खरी लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी कदम विरुद्ध देशमुख म्हणजेच काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यात झाली. आता यापैकी गुलाल कुणाचा, ते आज कळेल.
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी कडेगाव तालुक्यात 71.55 टक्के चुरशीने मतदान झाले. तालुक्यात काँग्रेस, भाजपासह अन्य पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य आज समजेल. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार गटात आणि पंचायत समितीच्या आठ गणात कोण ठरणार बाजीगर? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कडेगाव तालुक्यात वांगी, तडसर, कडेपूर व देवराष्ट्रे असे चार जिल्हा परिषदेचे गट आहेत, तर तडसर, शाळगाव, कडेपूर, हिंगणगाव बुद्रुक, वांगी, नेवरी, देवराष्ट्रे आणि चिंचणी असे आठ पंचायत समिती गणासाठी मतदान झाले. या निवडणुकीत चार जिल्हा परिषद गटासाठी 10, तर पंचायत समितीच्या आठ गणासाठी 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर ठाकले.
मागील महिनाभरात काँग्रेस, भाजपकडून जोरदार प्रचार झाला. कदम व देशमुख गटाने प्रतिष्ठा पणाला लावली होती. विकासकामे, पाणीटंचाई, रस्ते, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मुद्द्यांवर प्रचार रंगला होता. शेवटच्या क्षणापर्यंत प्रचारात चुरस दिसून आली. प्रत्येक उमेदवार विजय निश्चित असल्याचा दावा करत होता. तालुक्यात एकूण 1 लाख 35 हजार 587 मतदारांपैकी 97 हजार 11 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 49 हजार 645 पुरुष, तर 47 हजार 367 महिला मतदारांनी मतदान केले. एकूण 148 मतदान केंद्रांपैकी 53 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग केले होते. आता विजयानंतर होणाऱ्या जल्लोषाची तसेच पराभवानंतरच्या राजकीय हालचालींची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे. या निवडणुकीने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार की नाही, हे आज स्पष्ट होणार आहे.
पैजांना उधाण...
जिल्हा परिषदेच्या गटात व पंचायत समितीच्या गणात आपलाच उमेदवार विजयी होणार, अशी खात्री असलेल्या भाजप व काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी विविध भागात पैजा लावल्या आहेत. त्यामुळे पैजांना उधाण आले आहे.