

कडेगाव शहर : यावर्षी मे महिन्यातच पावसाने तालुक्याला झोडपून काढले. 15 मेपासून सुरू असलेल्या कमी-जास्त पावसामुळे जून महिन्यातच तालुक्यातील लघू पाटबंधारेतील कडेगाव तलावासह, शिवाजीनगर, हिंगणगाव बुद्रुक, कोतीज, शाळगाव - बोंबाळेवाडी आदी लहान-मोठे तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे पाण्याच्या भूजल पातळीत वाढ झाली. त्यामुळे यंदा पाणी टंचाई भासणार नाही, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
कडेगाव तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. परंतु टेंभू आणि ताकारी सिंचन योजनांच्या माध्यमातून तालुक्याचा कायापालट झाला. तालुक्याचे एकूण 58 हजार हेक्टर क्षेत्र आहे, त्यापैकी 50 हजार हेक्टर क्षेत्र बागायत व पेरणीयुक्त आहे. खरीप व रब्बीचे क्षेत्र जवळपास 25 हजार हेक्टर आहे, तर पारंपरिक बागायत ऊस पिकांचे जवळपास 25 हजार हेक्टर क्षेत्र आहे.
तालुक्यात मार्च व एप्रिल महिन्यात बहुसंख्य तलाव कोरडे ठणठणीत होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान, मे महिन्यात पावसाच्या सरी कोसळू लागल्या. मेअखेर व जून महिन्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील कडेगाव, शिवाजीनगर, कोतीज, शाळगाव-बोंबाळेवाडी, हिंगणगाव, चिंचणी, करांडेवाडी या सर्व मोठ्या तलावांसह लहान-मोठे पाझर तलावही ओसंडून वाहू लागले आहेत. तालुक्यातील येरळा, नांदणी या दोन प्रमुख नद्यांसह महादेव ओढा, निमसोड ओढा, सोनहिरा ओढा, नाले दुथडी भरून वाहत आहेत. अद्याप पावसाचे जुलै, ऑगस्ट आणि एप्रिल महिने बाकी आहेत. त्यामुळे आणखी पाणी पातळीत वाढ होणार आहे. तालुक्यातील ओव्हर फ्लो झालेले तलाव, क्षमता (दशलक्ष घ.फू) पुढीलप्रमाणे : कडेगाव : 88.38, शाळगाव - बोंबाळेवाडी : 80.74, करांडेवाडी : 48.50, शिवाजीनगर : 77.42, चिंचणी : 157 , हिंगणगाव बुद्रुक : 266.98, कोतीज : 51.77.