

कडेगाव शहर : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या कडेगाव शहरात गुढीपाडव्यानिमित्त आयोजित हिंदू संमेलनात हिंदुत्ववादी नेत्या हर्षिता ठाकूर यांनी मुस्लिम समाजाविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून, कडेगाव येथील हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजातील नागरिकांनी हर्षिता ठाकूर यांचा निषेध केला आहे. त्यांच्याविरोधात कडेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरपंचायत येथे आयोजित सर्वपक्षीय बैठकीत एकमुखाने करण्यात आली.
कडेगाव शहरात गुढीपाडव्यानिमित्त हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत शांततेत सुरू असतानाच हर्षिता ठाकूर यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले. या विधानामुळे शहरात संतापाची लाट पसरली आहे.कडेगाव शहरात गेल्या 200 वर्षांपासून हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जोपासली जात आहे. येथील मोहरम सण संपूर्ण महाराष्ट्राला एकतेचा संदेश देतो. हिंदूंच्या सणात मुस्लिम आणि मुस्लिमांच्या सणात हिंदूंना मानाचे स्थान देण्याची येथे प्रथा आहे. अशा सुसंस्कृत शहरात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या निषेध बैठकीस नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष अमोल डांगे, विरोधी पक्षनेते विजय शिंदे, ज्येष्ठ नेते सुरेश थोरात, दीपक भोसले, संतोष डांगे, माजी उपनगराध्यक्ष साजिद पाटील, राजू जाधव, डी. एस. देशमुख, माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख, नगरसेवक विजय गायकवाड, संदीप काटकर, सागर सकते, नीलेश लंगडे, दादासाहेब माळी, सुनील मोहिते, सागर सूर्यवंशी, संजय तडसरे, जीवन करकटे, नितीन शिंदे, वैभव देसाई, शशिकांत रासकर, संजय पालकर, नासिर पटेल, मुक्तार पटेल, सिद्दिक पठाण, इम्तियाज शेख, सूरज कडेगावकर, ॲड. अश्रफ इनामदार, जैनुल मुल्ला यांच्यासह हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.