

देवराष्ट्रे : डोंगरा एवढ्या टेकड्या फोडून, दगड-गोटे वेचून, रक्ताच पाणी करून या जमिनी तयार केल्या आहेत. ताकारी योजनेच्या पाण्याने या ओसाड माळरानावर नंदनवन फुलले आहे. आता गरज नसताना नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचा घाट सरकारने घातला आहे. आमचा जीव देऊ, पणं जमिनी देणार नाही, असा आक्रमक पवित्रा कडेगाव-पलूस तालुक्यांतील महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी घेतला आहे. दोन्ही तालुक्यांत शेतकऱ्यांची एकजूट झाली असून गावोगावी बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधी समितीच्यावतीने 4 मेरोजी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गामध्ये कडेगाव व पलूस तालुक्यातील सुपीक जमीन मोठ्या प्रमाणात जाणार आहे. जमिनी द्यायला दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून बाधित शेतकऱ्यांनी उप विभागीय अधिकारी, तहसीलदार यांना निवेदने देऊन विरोध दर्शवला आहे. एवढ्यावरच न थांबता कडेगाव-पलूस तालुक्यांतील महामार्ग बाधित शेतकऱ्यांची कृती समितीची स्थापना करण्यात आली असून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू करण्यात आले आहे. या बैठकांमधून शेतकऱ्यांचा आक्रोश आणि तीव्र संताप पाहावयास मिळत आहे. महामार्गाच्या प्रस्तावित रेखांकनानुसार सुपिक जमिनी, फळबागा, जनावरांचे गोठे, घरे यांसह सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यालाही फटका बसणार आहे.