Kadegaon News : कडेगाव तालुक्यात युरियाचा तुटवडा

शेतकऱ्यांतून चौकशीची मागणी; पिकांचे नुकसान
Urea News
कडेगाव तालुक्यात युरियाचा तुटवडा File Photo
Published on
Updated on

अरुण साळुंखे

नेवरी : कडेगाव तालुक्यामधील अनेक कृषी केंद्रांमधून सध्या युरियाचा तुटवडा भासत आहे. ऐन हंगामात युरिया खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची सगळीकडे धावपळ चालू आहे. वेळेत युरिया उपलब्ध होत नसल्यामुळे पिकांचे नुकसान होत असून युरियाचा पुरवठा नियमित करावा, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.

सध्या खरीप हंगाम सुरू आहे. पावसाच्या अंदाजानुसार जुलैमध्ये नेहमीप्रमाणे ऊस फोड मशागत व खरीप हंगाम पेरणीनंतरही पिकांच्या वाढीसाठी युरिया नत्र खतांचा वापर केला जातो. परंतु दोन महिन्यांपासून तालुक्यातील अनेक कृषी केंद्रांमध्ये युरियाचा तुटवडा आहे. प्रत्येक वर्षी ऐन हंगामामध्ये युरियाचा होणारा तुटवडा हा कृत्रिम का नियमित याबाबत शेतकरी वर्गातून चर्चा आहे. अनेक कृषी केंद्रांमधून शेतकऱ्यांनी युरियाची मागणी केली की दुसरे काय देऊ का? असे विचारले जात आहे किंवा दुसऱ्या खतांचा सल्ला दिला जात आहे.

खेडेगावांमधून अनेक कृषी केंद्रे कार्यरत आहेत. जिल्हा कृषी विभागाला याबाबत माहीत असूनही सर्व काही आलबेल चालू आहे, तर काही वितरकांकडून युरियाच्या किमतीबाबत मनमानी केली जात आहे. काही कृषी केंद्र चालकांकडून युरिया घेण्यासाठी अन्य खते शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत.

खत विक्रेत्यांकडून मनमानी

अगोदरच पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी वर्ग सध्या आर्थिक विवंचनेत आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत खत विक्रेत्याकडून वेळ साधून शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे. याबाबत जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी चौकशी करून शेतकऱ्यांना योग्य भावामध्ये युरिया उपलब्ध करून द्यावे तसेच ज्या कृषी केंद्रांमधून युरिया खताबरोबर अनावश्यक खते शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहे. त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news