कडेगाव : टेंभूच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांचा टाहो

कडेगाव : टेंभूच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांचा टाहो

कडेगाव ; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शिवाजीनगर येथील टेंभू योजनेच्या टप्पा क्र. दोनमधील तीन पंपांपैकी दोन पंपांच्या विद्युत रोहित्रातील बिघाडामुळे सुर्ली आणि कामथी कालव्याचे पाणी बंद झाले आहे. परिणामी पिके वाळली असून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टेंभूच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांनी टाहो फोडला आहे. तातडीने पाणी सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

टेंभूच्या शिवाजीनगर टप्पा क्र. दोनमधून 1400 अश्वशक्तीचे तीन पंप बसवण्यात आले आहेत. या पंपांना दोन रोहित्राद्वारे विद्युत पुरवठा केला जातो. मात्र यामधील एक रोहित्र बिघाडामुळे बंद पडले. त्यामुळे तीन पैकी दोन पंप बंद आहेत. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

योजनेच्या शिवाजीनगर टप्प्यातील सुरू असलेल्या केवळ एकाच पंपाद्वारे लाभक्षेत्रातील शेतीपिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. बिघाड झालेल्या रोहित्र दुरुस्तीचे काम सातारा येथे सुरू आहे. दुरुस्ती होताच पाणी दिले जाईल, असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

चुकीच्या निर्णयाचा शेतकर्‍यांना फटका

सुर्ली, कामथी कालव्याला सुरळीत पाणी पुरवठा होत होता. मात्र टेंभू योजनेच्या माहुली येथील टप्पा क्र. तीनच्या एका रोहित्रामध्ये बिघाड झाला होता. त्यावेळी टेंभू योजनेच्या प्रशासनाने शिवाजीनगर येथील टप्पा क्र. दोनचा ट्रान्सफार्मर काढून माहुली येथील टप्पा क्र. तीनमध्ये बसविला. माहुली येथील रोहित्र काढून दुरुस्त करून घेतले. हे रोहित्र शिवाजीनगरच्या टप्पा क्र. दोनसाठी बसविला. मात्र तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे रोहित्र बंद पडले. त्यामुळे टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. वस्तुतः शिवाजीनगर टप्पा क्र. दोनमधील विद्युत रोहित्र हलवण्याची गरज नव्हती. माहुली टप्प्यातील बिघाड झालेल्या रोहित्रची तातडीने दुरुस्ती करून ते तिथेच जोडणे आवश्यक होते. अधिकार्‍यांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका कडेगाव तालुक्यातील नेर्ली, अपशिंगे, कोतवडे, खंबाळे, कडेगाव, शिवाजीनगर, विहापूर, शाळगाव, बोंबाळेवाडी आदी गावांना बसला असून शेतीपिके पाण्याअभावी वाळून चालली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news