

रजाअली पिरजादे
कडेगाव शहर : कडेगाव तालुक्यातील येरळा नदीकाठचा सुपीक भाग सध्या मोठ्या चिंतेत सापडला असून प्रस्तावित ‘शक्तिपीठ’ महामार्गाच्या नव्या आराखड्यामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांवर संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. नेवरी, वडियेरायबाग, शेळकबाव, वांगी, शिरगाव आणि देवराष्ट्रे अन्य गावांतील बागायती शेती या प्रकल्पाच्या कक्षेत येत असल्याने स्थानिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
येरळा काठचा हा पट्टा पाण्याच्या उपलब्धतेमुळे कृषी क्षेत्रात प्रगत मानला जातो. ताकारी, टेंभू आणि आरफळ सिंचन योजनांच्या माध्यमातून येथे विविध पिकांची लागवड केली जाते. द्राक्षे, ड्रॅगन फ्रूट, केळी, आले, हळद, भाजीपाल्याच्या उत्पादनातून शेतकऱ्यांनी आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. अनेक तरुणांनी आधुनिक शेतीचा अवलंब करून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या आहेत. मात्र प्रस्तावित महामार्गासाठी याच सुपीक जमिनींची निवड झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. बहुतांश शेतकरी लहान भूधारक असून त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. जमीन संपादन झाल्यास त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्तकेली जात आहे.
या प्रकल्पासाठी स्थानिक स्तरावर ठोस मागणी नसताना आणि पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याचे सांगितले जात असताना, सुपीक पट्टाच का निवडण्यात आला, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. नेवरीसह परिसरातील गावांमध्ये या विरोधात आंदोलनाची ठिणगी पडली असून ग्रामस्थांनी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून आराखड्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली आहे.