

कडेगाव शहर : कडेगाव भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख या बंधूंमधील मतभेद दूर होऊन मनोमीलन झाले आहे. त्यामुळे तालुक्यात व पर्यायाने पलूस- कडेगाव मतदारसंघातील राजकीय समीकरणात बदल होणार आहे. मनोमीलनाने भाजपा कार्यकर्त्यांत उत्साह आहे, तर कदम गटाला अर्थात काँग्रेसला रणनीती बदलावी लागणार आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चारही गटात व पंचायत समितीच्या आठही गणांत चुरशीच्या लढती होणार यात शंका राहिली नाही.
भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यातील मतभेदांमुळे पलूस नगरपरिषदेत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले, अशी चर्चा होती; तर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत देशमुख बंधूंमधील वाद कायम राहिला, तर काय होणार? अशी भीती कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत होती. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांत मोठ्या प्रमाणात नैराश्य पसरले होते. परंतु भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे यांनी कडेगाव मुक्कामी येऊन बैठक घेत देशमुख बंधूंतील मतभेद मिटवले. देशमुख बंधूंनीही माध्यमासमोर येत आपल्यातील मतभेद मिटल्याचे जाहीर केले. ते पुन्हा नव्या दमाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे येथे आता पूर्वीप्रमाणे भाजप विरुद्ध काँग्रेस असा पुन्हा अटीतटीचा सामना व कार्यकर्त्यांमध्ये पार्टीस्पीड पाहायला मिळणार आहे.
दुसरीकडे डॉ. पतंगराव कदम यांनी सलग 30 वर्षे तालुक्यावर व पलूस-कडेगाव मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व राखले. त्यांच्यानंतर आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सलग तीनवेळा विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक करीत वर्चस्व अबाधित ठेवले, तर काँग्रेस पक्षाची मजबूत बांधणी केली आहे. माजी आमदार मोहनराव कदम यांचेही पक्षवाढीत मोठे योगदान राहिले आहे. एकंदरीत तालुक्यावर कदम गटाचेच वर्चस्व आजअखेर राहिले आहे. आता तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा एकदा कदम आणि देशमुख असाच पारंपरिक संघर्ष पाहण्यास मिळणार आहे. देशमुख बंधूंची तंटामुक्ती, कदम गटाची नव्याने बांधावी लागणारी रणनीती आणि दोन्ही गटातील सक्षम उमेदवार यामुळे ही निवडणूक चुरशीने होणार यात शंका नाही.