

सांगली : विवेक दाभोळे
सातत्याने उत्पादन खर्चात होत असलेली वाढ, निसर्गाचा वाढलेला लहरीपणा, बदलते हवामान, बदलत्या 'क्रॉप पॅटर्न' चा झटका व अपेक्षेइतके देखील न मिळणारे उत्पादन आणि उत्पन्न यामुळे सांगली जिल्ह्यातील पारंपरिक ज्वारीचे पीक जवळपास संपलेच आहे. पारंपरिक वाण काळाच्या पडद्याआड गेले आहेत. जोंधळ्याचा हुरडा हा शब्द तर पुस्तकातच वाचावा लागतोय. उत्कृष्ट, पालेदार कडबा शोधूनदेखील सापडत नाही. परिणामी ज्वारीचे दर वाढत असून भाकरी महाग होऊ लागली आहे. यावेळच्या २०२६-२०२७ च्या चालू हंगामात १३ हजार ९४९ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे.
एकेकाळी पांढऱ्या शुभ्र ज्वारीसाठी सांगली जिल्ह्याचे तमाम मराठी मुलखात नाव होते. तोपर्यंत जिल्ह्यात ममदापुरी, गुंडी, मालदांडी ३५ हे पारंपरिक वाण मोठ्या प्रमाणात लागवडीसाठी वापरले जात होते. ज्वारीचा हुरडा, खर्डा आणि दही हा बेत शिवारात रंगत असे. जिल्हा तर जणू ज्वारीचे कोठार ठरत होता. मात्र आता हे चित्र बदलले आहे. आता तर ज्वारीचे कोठार असलेल्या जिल्ह्याची ओळखही नष्ट होते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. काळाच्या ओघात उत्पादन खर्चात झालेली वाढ निसर्गाचा वाढलेला लहरीपणा आणि बाजारपेठेत मिळत असलेला दर यामुळे शेतकरी नगदी पिकांकडेच आकर्षित झाला आहे.
आता घटते क्षेत्र आणि होत असलेले दुर्लक्ष यामुळे आता मालदांडी ज्वारीचे वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठीच प्रयत्न करणे ही काळाची गरज झाली आहे. आता जरी दुष्काळी परिस्थिती असली तरी देखील शेतकऱ्यांचा कल बागायती पिकांकडे कायम राहिला आहे.
पारंपरिक ज्वारीची वैशिष्ट्ये...
टपोरे दाणे आणि पांढरी शुभ्र असणाऱ्या पारंपरिक ज्वारीला मोठी मागणी होती. आहारात भाकरीचे महत्त्व कायम आहे. यामध्ये ग्लुकोजची मात्रा असल्याने ती गोड असते. अन्य धान्यांच्या तुलनेत पारंपरिक ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन, खनिज पदार्थ यांचे प्रमाण अधिक असल्याने खाण्यासाठी ही ज्वारी उत्तम ठरत होती. अजून देखील निरोगी आयुष्यासाठी जेवणात ज्वारीचे महत्त्व कायम आहे.
या होत गेल्या अडचणी...
पारंपरिक ज्वारीचे वेगळेपण कायम असले तरी बाजारमूल्य हे कधी वाढलेच नाही. दुसरीकडे उत्पादन खर्च मात्र वाढत गेला. आता तर हिख्या चाऱ्याचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी मालदांडी ज्वारीच्या उत्पादनाबरोबरच चारा म्हणून कडबा उपयोगी पडत होता. मात्र आता कडबा शोधून देखील सापडत नाही. वास्तविक पाहता शासनाने ज्वारीवर प्रक्रिया उद्योग उभारले असते, तर नक्कीच पारंपरिक ज्वारी टिकून राहिली असती. आता तर केवळ जिल्ह्यातच नाही, तर राज्यात ज्वारीचे क्षेत्र घटलेले आहे.
यामुळे घटले ज्वारीचे क्षेत्र...
एकेकाळी जिल्हा राज्यात सोलापूरपाठोपाठ पारंपरिक ज्वारीच्या उत्पादनात आणि क्षेत्रात देखील आघाडीवर होता. मात्र बदलत्या काळात शेतीत सिंचन वाढले, वातावरण बदलले, अस्थिर हवामान आणि जोडीला वाढलेला उत्पादन खर्च आणि घटत गेलेले एकरी उत्पन्न यामुळे पारंपरिक ज्वारीचे पीक कमी होत गेले. आता तर गावा-गावात ज्वारीचा एखादाच प्लॉट नजरेस पडतो.
बदलती मानसिकता
अगदीच बारकाईने पाहिले, तर समोर येत असलेली आकडेवारी शेतकऱ्यांची बदलती मानसिकता दर्शवते. सन १९५६-५७ च्या खरप हंगामात जिल्ह्यात २ लाख ४५ हजार ६५१ हेक्टर ज्वारीचे क्षेत्र होते. सन १९६०-६१ च्या खरिपात ज्वारी वाढून २ लाख ५९ हजार २१२ हेक्टरमध्ये होती. पुढे सत्तरच्या दशकात ज्वारीचे क्षेत्र आणि पीक चांगले होते. मात्र नंतरच यात बदल होऊ लागला. आता तर सन २०२२-२०२३ च्या खरिपात अवघ्या २० हजार ६१० हेक्टरमध्ये संपूर्ण जिल्ह्यात ज्वारीचा पेरा झाला होता. २३-२४ मध्ये तर जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र जेमतेम ६ हजार ४७९ हेक्टर इतकेच मर्यादित राहिले. २४-२५ मध्ये जेमतेम ११ हजार हेक्टर क्षेत्र राहिले.
२५-२६ मध्ये तर चित्र फारच बदलले. पीकक्षेत्रात घट आली. उत्पादन घटले. अर्थात खरिपात २५ हजार ९६८ हेक्टर क्षेत्रात पेरा होता, पण रब्बी हंगामात मात्र क्षेत्रात चांगलीच घट झाली. आता तर २०२६-२०२७ च्या चालू खरीप हंगामात १३ हजार ९४९ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक क्षेत्र हे तासगाव तालुक्यात म्हणजे १० हजार ७२१ हेक्टर इतके आहे. ज्वारीचे कोठार मानले जात असलेल्या आटपाडी आणि जत तालुक्यात तर ज्वारी पाचशे हेक्टर देखील नाही.
रब्बी ज्वारीच्या क्षेत्रातही घटच
तसेच २०२१-२०२२ च्या रब्बी हंगामापासून जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र देखील सतत घटतच राहिले आहे. २१-२२ मध्ये रब्बी ज्वारी १ लाख ३७ हजार १२५ हेक्टर क्षेत्रात होती. सन २०२२-२३ मध्ये हाच आकडा १ लाख २२ हजार ३९१ हेक्टर राहिला. २३-२४ मध्ये क्षेत्र किंचित वाढून ते १ लाख २६ हजार ६५ हेक्टर झाले. सन २०२४-२५ मध्ये पुन्हा क्षेत्र घटून ते १ लाख १९ हजार ३७३ हेक्टर झाले. २०२५-२६ या हंगामात तर या क्षेत्रात घट होऊन १ लाख १४ हजार ७२८ हेक्टर इतकेच रब्बी ज्वारीचे क्षेत्र राहिले.
खरीप क्षेत्रात चढ-उतार
जिल्ह्यात सन २०२२-२०२३ या हंगामात जेमतेम २० हजार ६१० हेक्टर ज्वारीचा पेरा झाला होता. सन २०२३-२०२४ च्या हंगामात अवघा ६ हजार ४७९ हेक्टर इतकाच पेरा झाला. सन २०२४-२०२५ च्या हंगामात तर हे क्षेत्र चांगलेच घटले आणि सततच्या पावसाने ज्वारी साधली देखील नाही. याचा फटका बसून ज्वारीचे क्षेत्र आणि पीक देखील कमी झाल्याचे चित्र स्पष्ट होते.