

दिघंची : दिघंची परिसरात रब्बी हंगामातील ज्वारी काढणीस सुरुवात झाली असून शेतकरी सध्या काढणीच्या कामात गुंतले आहेत. मात्र परिसरात ज्वारी लागवड कमी झाल्यामुळे कडब्याचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या कडब्याचे दर प्रति शेकडा सुमारे 3500 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे पशुपालकांना चाऱ्यासाठी अधिक खर्च करावा लागत आहे.
परिसरातील बदलत्या हवामानाचा परिणाम शेती पद्धतीवरही होत आहे. अतिवृष्टीत तग धरण्याची क्षमता, हिरवा व सकस चारा उपलब्ध होणे तसेच लागवडीपासून काढणीपर्यंत यांत्रिकीकरणाची सुविधा उपलब्ध असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात मका पिकाकडे वळत आहेत. परिणामी पारंपरिक ज्वारी व बाजरीच्या लागवडीत घट होत आहे.
गेल्या काही वर्षांत सुधारित बियाणे, ठिबक सिंचन व आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मक्याच्या हेक्टरी उत्पादन क्षमतेत वाढ झाली आहे. त्यामुळे कमी जोखीम आणि अधिक उत्पादनाच्यादृष्टीने मका पिकाला शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जात आहे. ज्वारी लागवड घटल्याने कडब्याची उपलब्धता कमी झाली असून पशुपालकांना चाऱ्यासाठी जादा खर्च करावा लागत आहे.