

इस्लामपूर : सरकारी बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांना 16 लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी एकावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. अमोल महादेव आजमाने (मूळ रा. कामेरी, ता. वाळवा, सध्या रा. अक्षर कॉलनी इस्लामपूर) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी सूर्यकांत बापूसाहेब शिंदे (रा. बिळाशी, ता. शिराळा) यांनी फिर्याद दिली आहे. विशाल विष्णू पाटील (रा. बिळाशी) व ऋतुजा कुशल पडळकर (रा. लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत. फसवणुकीचा हा प्रकार ऑक्टोबर 2023 ते जून 2024 या कालावधीत घडला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ऑक्टोबर 2023 मध्ये सूर्यकांत शिंदे व त्यांचे मित्र विष्णू पाटील हे इस्लामपूर येथील प्रांत कार्यालयात आले होते. तेथे अमोल आजमाने याच्याशी त्यांची ओळख झाली. त्याने, मी सरकारी बँकेत, सरकारी कार्यालयात तरुण-तरुणींना नोकरीला लावतो. आतापर्यंत 1400 जणांना सरकारी नोकरीस लावले आहे, असे आमिष त्याने दाखवले. त्यानंतर संशयित अमोल हा सूर्यकांत यांच्याशी वारंवार संपर्क करून, कोणाला नोकरीला लावायचे आहे का? अशी विचारणा करत होता.
सूर्यकांत यांनी त्यांच्या ओळखीचे विशाल पाटील, ऋतुजा पडळकर यांना नोकरीची गरज आहे, असे अमोल याला सांगितले. अमोल याने सरकारी बँकेत दोघांना नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर 15 डिसेंबर 2023 रोजी विशाल व ऋतुजा यांची शैक्षणिक कागदपत्रे दिली. दोघांचे 80 हजार रुपये ऑनलाईन अमोल याला पाठवले. त्यानंतर अमोल याने दोघांची कागदपत्रे मुंबईला पाठवून दिल्याचे सांगितले. विशाल व ऋतुजा यांना त्यांची नियुक्ती झाल्याचे मेल येत होते. अमोल याने कामाचे म्हणून प्रत्येकी 7 लाख 50 हजार रुपये द्या, असे सांगितल्याने अमोल याला फेब्रुवारी 2024 मध्ये इस्लामपूर येथील एका हॉटेलमध्ये विशाल व ऋतुजा यांचे मिळून 15 लाख रुपये अमोल याला दिले. त्यानंतर अमोल याला नोकरीबद्दल विचारले असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पैसे मागितले असता टाळाटाळ करत होता. 21 जून 2024 रोजी सूर्यकांत, विष्णू व त्यांचा मुलगा विशाल हे पेठनाका येथील अमोल याच्या ऑफिसमध्ये गेले. त्यांनी अमोल याच्याकडे पैशाची मागणी केली. अमोल व सूर्यकांत यांच्यात वाद झाला. अमोल याने सूर्यकांत यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली.