

सांगली : गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘गुलाबराव पाटील जीवन गौरव पुरस्कार’ माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सावित्रीबाई फुले (पुणे) विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. सदानंद मोरे यांना, तर ‘गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार’ डॉ. लता देशपांडे व आप्पासाहेब पाटील यांना जाहीर करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.
ते म्हणाले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खासदार, सहकार चळवळीचे देशातील अग्रणी नेते गुलाबराव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रतिवर्षी गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्यावतीने गेली दोन दशके सहकारतीर्थ गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह आणि 25 हजार रुपये, तर ऋणानुबंध पुरस्काराचे स्वरूप 15 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, असे आहे. कार्यकारी विश्वस्त प्रमिलादेवी पाटील, विश्वस्त शंकर तावदारे, डॉ. इक्बाल तांबोळी व अॅड. वीरेंद्रसिंह पाटील, बिपीन कदम, प्रा. एन. डी. बिरनाळे, सनी धोतरे, रंगराव शिपुगडे, प्रशांत अहिवळे, महावीर पाटील यावेळी उपस्थित होते.
रविवार, 2 मार्चरोजी सकाळी 10 वाजता सांगलीत भावे नाट्य मंदिर येथे आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत 98 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्याहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.