

ईश्वरपूर : ताकारी (ता. वाळवा) येथे बस स्थानकाजवळील सराफी दुकान फोडून चोरट्यांनी शोकेसमधील साडेचार तोळ्यांचे सोन्याचे दागिने, साडेसहा किलो चांदी आणि 10 हजारांची रोकड, असा 9 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हा चोरीचा प्रकार शनिवार, दि. 13 रोजी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी सराफ दुकानदार महेश हणमंत पाटील (वय 42, रा. बांबवडे, ता. पलूस) यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. घटनास्थळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण आले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक परिसरात ठाण मांडून आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ताकारी बस स्थानक परिसरात संतोष पाटील यांच्या मालकीचे महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी संतोष पाटील दुकान बंद करून घराकडे गेले होते. शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ते दुकानात आले, त्यावेळी दुकानातील साहित्य विस्कटले होते. दुकानाची मागची भिंत फोडली असल्याचे दिसून आले.
दुकानातील शोकेसमधील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 8.960 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 10 ग्रॅमचे सोन्याचे मणी, 4 किलो 43 ग्रॅमचे फॅन्सी चांदीचे पैजण, 474 ग्रॅमचे डिझाईनचे चांदीचे लोडे वाळे, 165 ग्रॅमचे फॅन्सी वेढण, 364 ग्रॅमचे फॅन्सी हुपरी पैंजण, 291 ग्रॅमचे चांदीचे ब्रेसलेट, 225 ग्रॅमची चांदीची चेन, 351 ग्रॅम वजनाची लक्ष्मी, गणपती व अन्नपूर्णा देवीची चांदीची मूर्ती, 438 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या अंगठ्या, असे सोन्या व चांदीचे दागिने, दहा हजार रुपयांची रोकड, असा 9 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता.
घटनेची माहिती मिळताच सांगली गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरील ठशांचे नमुने घेण्यात आले आहेत.