

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांचा आज, बुधवारी, 18 जून रोजी दुपारी 3.00 वाजता मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. त्यासाठी सांगलीतून कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी जयश्री पाटील यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश व्हावा, अशी इच्छा जयश्री पाटील यांनी व्यक्त केली होती.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यावेळी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे, कार्याध्यक्ष शीतल लोंढे, उदय पाटील यांच्यासह मदन पाटील गटाचे कार्यकर्ते 60 वाहनांमधून मंगळवारी मुंबईला रवाना झाले. भाजप प्रवेशानंतर सांगलीतही मेळावा आयोजित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. भाजप नेत्यांच्या उपस्थितीत लवकरच मेळावा होईल, असे सूत्रांनी सांगितले.