Jaydeep Abhyankar : ट्रस्टच्या आवारातील खोकी पाडणे बेकायदा कृत्य ठरेल

जयदीप अभ्यंकर : राजवाडा परिसरातील रस्ता, खोकी ही गणपती पंचायतन संस्थानची खासगी मालमत्ता
Sangli News
सांगली : राजवाडा परिसरातील खोकी हटवण्यास आलेल्या अतिक्रमणविरोधी पथकाला खोकीधारकांनी विरोध केला.
Published on
Updated on

सांगली : राजवाडा चौक ते दरबार हॉलपर्यंतचा परिसर हा श्री गणपती पंचायतन संस्थान अंतर्गत श्री अभिषेक ट्रस्टच्या मालकीचा आहे. येथील खोकीधारक हे या ट्रस्टचे भाडेकरू आहेत. ट्रस्टच्या आवारातील खोकी कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेविना पाडणे हे बेकायदा कृत्य ठरेल. त्यामुळे महानगरपालिकेने मनमानी करू नये, अन्यथा खटला दाखल केला जाईल, असा इशारा श्री गणपती पंचायतन ट्रस्टचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

अभ्यंकर म्हणाले, राजवाडा येथील संपूर्ण मैदान क्षेत्र, ट्रेझरीसमोरील क्षेत्र, तुरुंग कार्यालयासमोरील क्षेत्र, तुरुंगाच्या पूर्वेकडील क्षेत्र, परिसर आणि रस्ते, रस्त्यासह दोन्ही बाजूंचा संपूर्ण जुना न्यायालय परिसराची मालकी ही श्री अभिषेक ट्रस्टची आहे. आमच्या या ट्रस्टचे नाव महसूल नोंदींमध्ये म्हणजेच सिटी सर्व्हे ऑफिसमध्ये असलेल्या प्रॉपर्टी कार्डमध्ये नोंदवले गेले आहे. ही संपूर्ण मालमत्ता श्री अभिषेक ट्रस्ट आणि श्री गणपती पंचायतन संस्थान यांच्या खासगी मालकीच्या आहेत. महानगरपालिका त्यामध्ये कोणत्याही प्रकारे बेकायदेशीरपणे घुसखोरी करून कायदा तुडवू शकत नाही.

राजवाडा चौकातून दरबार हॉलकडे (जुने जिल्हाधिकारी कार्यालय) जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या मालमत्तेत तात्पुरत्या स्वरुपात काही पत्र्याचे शेड, खोकी आहेत. हा खासगी रस्ता आहे आणि ट्रस्टच्या संमतीने आणि परवानगीने लोक त्याचा वापर करत आहेत. गेल्या 40 वर्षांपासून हे शेड, खोकी विविध व्यक्तींना भाडेपट्ट्यावर देण्यात आले आहेत. शनिवार, दि. 31 जानेवारीरोजी महानगरपालिकेतील काही अधिकारी आमच्या ट्रस्ट मालमत्तेच्या आवारात असलेले काही तात्पुरते शेड, खोकी कोणत्याही कायदेशीर मार्गाशिवाय पाडण्याच्या उद्देशाने आले होते. कोणतीही नोटीस न बजावता ट्रस्टच्या मालमत्तेत प्रवेश करणे हे कृत्य चुकीचे आहे. असे प्रकार यापुढे घडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अभ्यंकर यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news