

इस्लामपूर : तीन वर्षे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात घरोबा केल्यानंतर शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे काही दिवसांच्या सोबतीनंतर शिवाजीराव नाईक व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे गट वाळवा - शिराळा तालुक्यात पुन्हा आमने- सामने येणार आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नाईक - पाटील गटातील पारंपरिक सत्तासंघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. शिवाजीराव नाईक यांच्या अजित पवार गटातील प्रवेशामुळे येथे महायुतीची ताकत वाढणार आहे.2022 मध्ये शिवाजीराव नाईक यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती. मात्र नाईक यांच्या पक्षप्रवेशानंतर काही महिन्यातच राज्यात सत्तापालट झाले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांची चांगलीच कोंडी झाली होती. त्यातच शिवाजीराव नाईक यांचे अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षात न जाता भाजप पक्षामध्येच सक्रिय राहिले होते. काहींनी तर विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा उघड प्रचार केला होता. त्यामुळे नाईक यांच्या शिराळा व वाळवा तालुक्यातील 48 गावांतील गटात काहीसा विस्कळीतपणा आल्याचे दिसत होते.
गेली तीन दशके वाळवा - शिराळा तालुक्यात शिवाजीराव नाईक हे आमदार जयंत पाटील यांचे पारंपरिक विरोधक राहिले आहेत. 1999 व 2022 मध्ये राष्ट्रवादी पक्षात गेल्यानंतर काहीकाळ नाईक यांनी आमदार जयंत पाटील व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासोबत काम केले. आता पुन्हा अजित पवार गटात जाऊन शिवाजीराव नाईक यांनी या दोघांच्या विरोधात जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे यापुढील काळात पारंपरिक सामना पाहायला मिळणार आहे. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, तसेच नानासाहेब महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री सदाभाऊ खोत, वैभव नायकवडी, विक्रम पाटील आदी जयंत पाटील विरोधकांनी काही वर्षांपूर्वी दोन तालुक्यात विकास आघाडीच्या माध्यमातून जयंत पाटील यांच्यासमोर चांगलेच आव्हान उभा केले होते. मात्र अलीकडच्या काही काळात जयंत पाटील यांच्या विरोधकांच्यात ताळमेळ राहिला नसल्याचे दिसत होते. शिवाजीराव नाईक व राजू शेट्टी आघाडीतून बाजूला गेले होते. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा शिवाजीराव नाईक महायुतीच्या घटक पक्षात आल्याने वाळवा - शिराळा तालुक्यात महायुतीला बळ मिळू शकते. शिवाजीराव नाईक यांच्यासह आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित देशमुख, निशिकांत पाटील, राहुल महाडिक, आनंदराव पवार, सम्राट महाडिक, विक्रम पाटील, सी. बी. पाटील, वैभव पवार, गौरव नायकवडी हे महायुतीचे नेते येथे महाविकास आघाडीसमोर आव्हान उभे करण्यासाठी प्रयत्न करणार, हे मात्र निश्चित !
शिवाजीराव नाईकांचे वर्तुळ पूर्ण : शिराळा मतदारसंघाचे विधानसभेत चारवेळा प्रतिनिधित्व करणार्या माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची काँग्रेस पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. आता त्यांचे पक्षांतराचे वर्तुळ पूर्ण झाल्याची चर्चा मतदारसंघात आहे. काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याने 1995 च्या विधानसभा निवडणुकीत नाईक यांनी बंडखोरी केली. ते अपक्ष निवडून आले. त्यांनी महायुती सरकारला पाठिंबा देऊन राज्यमंत्रिपद मिळविले. त्यानंतर 1999 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून ते दुसर्यांदा आमदार झाले. 2004 च्या निवडणुकीत ते पुन्हा अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर भाजप पक्षात प्रवेश करून ते 2014 ला चौथ्यांदा निवडून आले. 2019 च्या निवडणुकीत भाजपमधील बंडखोरीने त्यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला, तर आता ते अजित पवार यांच्या पक्षात सामील झाले आहेत. दरम्यान, शिवाजीराव नाईक हे आता अजित पवार यांच्या पक्षात गेले आहेत. यामुळे वाळवा- शिराळा तालुक्यातील राजकीय संघर्षास नवीन वळण लागणार आहे. नाईक यांचे समर्थक आणि जयंत पाटील यांचे समर्थक आमने-सामने येणार आहेत.