

सांगली : मागील काळात महानगरपालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनली. भाजपचे नेते आले, विमानतळ देतो, हे देतो, ते देतो, असे आश्वासन देऊन गेले. त्याला माझा विरोध नाही. गेली आठ वर्षे भाजपची कारकीर्द होती, त्यात हे का झाले नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला. सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले, शहरात जागोजागी अस्वच्छता निर्माण झाली आहे. कचऱ्याचे ढीग वाढले आहेत. स्वच्छतागृह अडगळीच्या जागी आहेत. येथील ओव्हरफ्लो गटारांमुळे हा भाग वनवासवाडी बनला आहे. रस्त्यांचे दुखणे कायम आहे. अनेक अपघात झाले, लोकांनी आवाज उठवला तेव्हा कुठे जाग आली. मग स्थानिक लोकप्रतिनिधींनी केले काय? हा प्रश्न आहे.
मी पालकमंत्री असताना गव्हर्न्मेंट कॉलनीत जलकुंभ उभारण्यास सुरुवात केली. मात्र आमची सत्ता जाऊन तीन वर्षे झाली, तरी जलकुंभ पूर्ण झालेला नाही. एकही उद्यान विकसित झालेले नाही. सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. आम्ही उभारलेले नाना-नानी पार्क आता नशेखोरांचा अड्डा बनले आहे. शहरात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. आम्हाला एक संधी द्या. आम्ही ड्रग्जचे रॅकेट हुडकून काढू, गुन्हेगारीचा बीमोड करू.