

कुपवाड : राज्यात महापालिका निवडणुकीत भाजपा व शिंदेसेना यांचे जवळपास 70 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. देशात असा पहिलाच प्रकार झाला आहे. एकूणच हे चित्र पाहताना देशात लोकशाही धोक्यात आली, असे वाटत असून वाममार्गाने सत्तेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. त्यामुळे मतदारांनी जागरूकतेने प्रतिकार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आ. जयंत पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, यावेळी महापालिका निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्व उमेदवार निवडून द्या, कुपवाडचा चेहरमोहरा बदलू, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली. कुपवाडमध्ये प्रभाग एकमधील काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शेडजी मोहिते, रईसा रंगरेज, अभियंता सूर्यवंशी, विजय घाडगे यांच्या प्रचारार्थ अहिल्यानगर येथे मंगळवारी रात्री जयंत पाटील यांची सभा झाली. यावेळी खासदार विशाल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राहुल पवार, शेखर माने, माजी गटनेते किरण सूर्यवंशी, जमीर रंगरेज, मुश्ताक रंगरेज आदी उपस्थित होते.
आ. जयंत पाटील म्हणाले, भाजपवाले यापूर्वी काँग्रेसला देशातून हाकला, असे म्हणायचे. परंतु सध्या हा पक्षच काँग्रेसयुक्त झाला आहे. भाजपामधील निष्ठावंतांवर पुन्हा सतरंज्या उचलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भाजपाचा ताबा काँग्रेसने घेतला आहे. निवडणुकीत विरोधकांकडून पाऊस पाडला जाईल, त्यात तुम्ही वाहून जाल. त्यात अंघोळ करायला काही अडचण नाही. परंतु, या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वसामान्य उमेदवारांच्या मागे राहा.
खा. विशाल पाटील म्हणाले, सांगलीमध्ये परवा मुख्यमंत्री आले आणि आठ वर्षाचा पाढा वाचून गेले. हातात सत्ता असताना त्यांनी सांगलीसाठी आतापर्यंत काहीही केले नाही. काँग्रेसने तेलंगणा आणि कर्नाटकात सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेची कॉपी महाराष्ट्रात केली. सूज्ञ मतदारांनी निवडणुकीत भाजपाला धक्का द्यावा, तरच ते जाग्यावर राहतील. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या. यावेळी सर्व उमेदवारांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.