बोरगाव : भाजप-महायुती सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे. विरोधकांना माझ्याविरोधात बोलण्यास काहीच जागा नसल्याने ते अपप्रचार करून शेतकर्यांची दिशाभूल करीत आहेत. मात्र आमचा सूज्ञ व जागरुक शेतकरी त्यांच्या अपप्रचारास बळी पडणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, महाविकास आघाडीचे उमेदवार, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते बी. डी. पवार, दिलीपराव मोरे, ‘राजारामबापू’चे संचालक दादासाहेब मोरे, ‘कृष्णा’चे संचालक जे. डी. मोरे, माजी संचालक सुजित मोरे, अविनाश मोरे, माजी जि. प. सदस्य धनाजी बिरमुळे, बाळासाहेब पाटील, विजयराव पाटील, संजय पाटील, सुस्मिता जाधव, रूपाली सपाटे, देवराज देशमुख उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, राज्यात जे काही चांगले साखर कारखाने चालले आहेत, त्यात आपला कारखाना आहे. बापूंनी आपणास जो आदर्श घालून दिला, त्याप्रमाणे आपण सामान्य माणूस व शेतकर्यांचे हित साधत आहे. सध्या राज्यावर पावणेआठ लाख कोटींचे कर्ज आहे. मात्र या सरकारने सवंग लोकप्रियतेसाठी ज्या घोषणा केल्या, त्यामुळे राज्याची तिजोरी खाली झाली आहे. या सरकारने सव्वा लाख कोटी कर्जाची मागणी रिझर्व बँकेकडे केली आहे. म्हणजे प्रत्येक माणसावर 65-70 हजार रुपये कर्ज केले आहे. सुस्मिता जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. अॅड. विवेकानंद मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दामाजी मोरे, विश्वास मोरे, महेश पवार, पंकज पवार, सोसायटीचे अध्यक्ष हणमंत मोरे, केदार शिंदे, चंद्रहार पवार उपस्थित होते.