

इस्लामपूर : ‘आपलं नाव ऐकलं नाय, असं याक भी गाव नाय आणि सगळ्यांना नाय हाणलं, तर जयंत पाटील नाव नाय... क्या बडा तो सबसे दम बडा...’ यासारख्या भाषेत आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी येथे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले. आ. पाटील यांनी प्रथमच आ. पडळकर यांच्यावर जाहीर हल्लाबोल केला. आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत
येथील खुल्या नाट्यगृहात आ. पाटील यांची प्रकट मुलाखत झाली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या भाजप प्रवेशासह अनेक मुद्द्यांवर भूमिका जाहीर केली. जयंत पाटील यांच्या आई-वडिलावर बोलणार्यांच्या समर्थनार्थ भाजपने जाहीर सभा घेतली, याचे मात्र मनाला वाईट वाटले. वेळ प्रत्येकाची येत असते. या प्रकारामुळे जिल्ह्यातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. येत्या निवडणुकांत याचा परिणाम नक्की दिसेल, असेही ते म्हणाले.
अजित पवार यांच्यासोबतच्या संबंधांबद्दलच्या प्रश्नावर ते म्हणाले, पवार हे त्यांच्या पक्षासोबत सत्तेत सहभागी झालेत, पण इतर काही लोक पक्ष सोडून भाजपात जातायेत हे पटत नाही. अजित पवार यांच्याबद्दल माझे मत चांगलेच आहे. ते राजकारणात खूप कष्ट करतात, भरपूर कामही करतात. निवडणुकीत त्यांनी इथे येऊन टीका केली. राजारामबापू साखर कारखाना दर देत नाही असे ते म्हणाले. परंतु त्यांच्या साखर कारखान्याने किती दर दिला ते तुम्हीच पाहा. एफआरपीनुसार कारखाना दर देतोच. माझ्या निवडणुकीत मी कधीही ऊस दरावर बोलत नाही; कारण सहकारी कारखाना माझी खासगी मालमत्ता नाही. तो विषयच वेगळा आहे. इस्लामपुरात येऊन जे बोलतात, त्यांचा दर आणि तिथली परिस्थिती वेगळीच आहे.
आ. पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे-अजित पवार यांना लोकांचे प्रश्न सोडवणे जमत नसेल, तर त्यांनी बाजूला झाले पाहिजे. महापुराच्या प्रश्नावर सरकार अपयशी ठरले. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याचे कर्ज 9 लाख 50 हजार कोटींवर गेले आहे. येत्या काळात ते आणखी वाढेल. सरकार संकटात आहे. राज्यातील प्रत्येकाच्या डोक्यावर लाखाच्या वर कर्ज आहे. देवस्थाने जोडण्याच्या रस्त्यावर एक लाख कोटी खर्च करायला सरकारकडे रक्कम आहे, पण पूरग्रस्तांना मदत द्यायला पैसे नाहीत, ही शोकांतिका आहे.
विधानसभेचा जो निकाल लागला, तो मोकळ्या मनाने मान्य केला आहे. मात्र या निवडणुकीत निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद होती, हे आता दिसत आहे. यावर निवडणूक आयोग काहीच बोलण्यास तयार नाही. फुले-शाहू-आंबेडकर यांना मानणारा आमचा भाग आहे. त्याच परंपरेतील आम्ही लोक आहोत.
ते म्हणाले, नव्या पिढीने आपले मूळ विसरायला नको. हिंदुत्वात शूरपणा हवा. अहंकार आणि दमदाटी नसावी. हिंदुत्वावर मते मागणे भारतात फार काळ चालणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.