सांगली : गेल्या दहा-बारा वर्षांत हिंदू खतरें में आला आहे. यांच्याच हातात सत्ता असताना तो खतरें में का आला? असा सवाल करून, आम्हाला सत्ता द्या, हिंदूंना खतर्यातून बाहेर काढतो, असे उत्तर आमदार जयंत पाटील यांनी दिले. निमित्त होते ड्रेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने सांगलीत आयोजित महाराष्ट्र ख्रिश्चन-मुस्लिम अधिकार परिषदेचे.
‘डीपीआय’च्यावतीने सांगलीत आयोजित ख्रिश्चन-मुस्लिम अधिकार परिषदेचे उद्घाटन आ. जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. डीपीआयचे संस्थापक सुकुमार कांबळे अध्यक्षस्थानी होते. राज्यभरातील पुरोगामी, दलित, ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
आ. जयंत पाटील यांनी राज्य आणि केेंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. आ. पाटील म्हणाले, विविध जाती आणि धर्मांनी नटलेला भारत एकसंध ठेवण्याची जबाबदारी संविधानाने दिली आहे. या विविधतेतील शक्ती गांधी, नेहरू आणि स्वातंत्र्यसेनानींनी मान्य केली. धार्मिक एकाधिकारशाही व कट्टरतेने विकास होत नाही, हे पाक-बांगला-अफगाणिस्तानवरून समजते. माझा हिंदू इतर धर्म मान्य करणारा आहे. या देशावर ज्याचे प्रेम, निष्ठा आहे, तो कोणत्याही जातीचा, धर्माचा असला तरी, तो आम्हाला मान्य आहे, ही बहुसंख्य हिंदूंची भूमिका आहे आणि याचे भान ठेवूनच राजकारण केले पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा लढा धार्मिक नव्हता, तर स्वराज्यासाठी होता. त्यांनी रयतेचे राज्य तयार केले. शिवाजी महाराजांकडे अनेक मुस्लिम सरदार होते, तसे तिकडेही अनेक हिंदू होते. राजांनी अफझलखानाला मारले, तेव्हा त्यांच्यावर वार करणार्या कुलकर्णीला पण मारले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगायचा व्यवसायाच काहींनी चालवला आहे. खरा इतिहास वारंवार सांगायची गरज आहे, असे स्पष्ट मत आ. पाटील यांनी व्यक्त केले.
प्रा. सुकुमार कांबळे यांनीही जातीयवादी राजकारणावर कडाडून टीका केली. ख्रिश्चन आणि मुस्लिम आज भेदरलेल्या अवस्थेत आहेत. कारण हिंदूंची मते जातील या भीतीने कोणताही राजकीय पक्ष त्यांना पाठिंबा द्यायला तयार नाही. जाणीवपूर्वक भीतीदायक वातावरण तयार करण्याचे डाव रचले जात असून, सार्यांनी एकत्र येऊन हे डाव मोडा, असे आवाहन त्यांंनी केले. संविधानाची चौकट मोडणार्यांना मोडून काढू, असा इशाराही त्यांनी दिला.
डीपीआयचे राज्याध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी, मुस्लिम-ख्रिश्चनांबाबत नॅरेटिव्ह तयार करण्याचे काम सुरू आहे. मशीद आणि चर्चमधून बाहेर पडून सांस्कृतिक दहशतवाद ओळखा. वेळ भयंकर असल्याने सावध आणि सतर्क राहा असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक करताना गॅब्रियल तिवडे यांनी ख्रिश्चन आणि मुस्लिमांना जाणीवपूर्वक बदनाम करायचे षड्यंत्र रचले जात असल्याचे सांगितले.
राम कांबळे यांनी, ख्रिश्चनांवर धर्मांतराचे खोटे आरोप केले जात असल्याचे सांगत सांगली जिल्ह्यात संख्या जास्त असल्याने त्यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला. माजी आमदार राजू आवळे यांनी, अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढले असून सत्ताधारी जातीयवादाचे विष पेरत असल्याची टीका केली.
जमात-ए-इस्लामी हिंदचे सांगली जिल्हाध्यक्ष हाफिज मोहम्मद अली मुल्ला यांनी, माणसाच्या जगण्या-मरण्याचे सवाल गंभीर झाले असताना, जाती-धर्माच्या नावाखाली मनुवादी जाती-धर्मात दुश्मनी वाढवत असल्याचा आरोप केला.
श्रीनिवास चोपडे यांनी, अल्पसंख्याकांच्या बाबतीत प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप केला. प्रारंभी संविधान प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. दादासाहेब कस्तुरे यांनी संविधानाची प्रतिज्ञा दिली. अब्राहम आवळे, पॉल चाको, संजय बजाज, शेेवंता वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. विविध 13 ठराव मंजूर करण्यात आले.
मतांची चोरी करून सत्ता
सत्ताधार्यांनी सत्ता मतांची चोरी करून मिळवली हे राहुल गांधी यांनी दाखवून दिलेच, पण आता लोकही मान्य करायला लागले आहेत. नितीन गडकरी, अनुराग ठाकूर यांनीही त्यांच्या मतदारसंघातली मते कुठे गेली, असा सवाल केला आहे. मताच्या अधिकारालाच सुरुंग लावण्याचे काम सुरू आहे. असे करून लोकशाहीवर घाला घालणार्यांना किती पोसायचे याचा विचार करा, असे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.
युध्द का थांबवले?
देशाचा विकास सोडून सारे स्टंट चालले आहेत. तिकडे अमेरिकेत ट्रम्प चाळीस वेळा मीच युध्द थांबवलं असं सांगतात. इथं जवान लढत होते आणि आपण युध्द थांबवले. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यायची संधी आपण घालवली. सारा देश तुमच्या मागे असताना पाकला धडा शिकवण्यासाठी पावले का उचलली नाहीत? युध्द का थांबवले?, असे सवाल आ. जयंत पाटील यांनी केले.
उपराष्ट्रपतीच गायब
कोणाला खड्ड्यात घालायचे आणि कोणाला वरती काढायचे हे ठरवणारी यंत्रणा इथे तयार आहे, असे सांगून, इथे उपराष्ट्रपतीच गायब होऊ शकतात, तिथे तुम्ही-आम्ही किस झाड की पत्ती? असा सवाल आ. पाटील यांनी केला.