

इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधक एकवटले होते, तोच प्रयोग आता इस्लामपूर पालिकेसाठी पुन्हा होणार आहे. पालिकेची सत्ता पटकावण्यासाठी आगामी इस्लामपूर नगरपालिका निवडणूक महायुती म्हणून एकदिलाने लढविण्याचा निर्धार महायुतीच्या घटक पक्षांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. शहरातील विकास, नागरिकांचा विश्वास आणि स्थिर प्रशासन या तीन मुख्य मुद्द्यांवर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
महायुतीच्या सर्व प्रमुख घटकपक्षांच्या नेत्यांची बैठक येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. बैठकीला आमदार सदाभाऊ खोत, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील, माजी उपनगराध्यक्ष संजय कोरे, माजी नगराध्यक्ष चिमण डांगे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी नगरसेवक वैभव पवार, माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे, माजी नगरसेवक विजय कुंभार, शिवसेना तालुका प्रमुख सागर मलगुंडे, सतेज पाटील आदी उपस्थित होते.
या बैठकीत विविध विभागनिहाय चर्चा करण्यात आली. स्थानिक पातळीवरील विकास कामांना गती देणे, पक्षांमधील सुसंवाद वाढविणे, तसेच आगामी निवडणुकीसाठी एकत्रित प्रचार आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून नगरपालिकेत महायुतीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.