

मिरज : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील आणि भाजपचे नेते व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये मिरजेतील कार्यक्रमामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झडली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.
मिरजेच्या ऑक्सिजन पार्कमध्ये शनिवारी सायंकाळी ब्राह्मण समाजाच्यावतीने सांगली जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित होते.
कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच आमदार जयंत पाटील यांचे भाषण झाले. त्यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. जयंत पाटील म्हणाले, इतिहासामध्ये नानासाहेब पेशव्यांनी अनेकांना एकत्रित केले होते. पुण्यातूनच देशातील राज्यकारभार चालवला होता. महाराष्ट्राने देशावर राज्य केले होते. मराठी माणसांचे राज्य हे देशावर होते, हे विसरू नये. आता मात्र महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये द्वेष निर्माण केला जात आहे. दुसर्याला शिव्या देऊन आपण मोठे होत नाही. दुसर्याचा द्वेष करून आपण मोठे होऊ शकत नाही. जाती-जातीमध्ये द्वेष पसरवला जात आहे. हा द्वेष कसा कमी होईल यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असा सल्ला जयंत पाटील यांनी दिला. त्यानंतर आपले भाषण करून जयंत पाटील पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले.
त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी संयोजकांना विनंती करून भाषण करण्याची परवानगी घेतली. पडळकर यांनी जयंत पाटील यांचे नाव घेऊन त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मला भाषण करायचे नव्हते. पण मला भाग पाडले गेले. राज्यात जातीयवाद सुरू आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण, अशा पद्धतीने काही नेते वागत आहेत. मराठा विरुद्ध ब्राह्मण असा वाद निर्माण केला जातो. मात्र ब्राह्मण समाजाने असा कार्यक्रम मिरजेत घेऊन ते पुसण्याचे काम केले. जातीयवादी संघटना कोणी पोसल्या, असा सवाल पडळकर यांनी केला. ब्राह्मणांच्या विरोधात बहुजनांना उभे करण्याचे उद्योग सध्या राज्यात सुरू आहेत. मते घेण्यासाठी काही नास्तिक लोक आहेत. त्यांना त्रास होऊ लागला की ते ब्राह्मणांची मदत घेतात.
राज्यातल्या एका नेत्याने तर 101 ब्राह्मणांना बोलावून मृत्युंजय जप केला. त्याची वाच्यता मात्र कुठेही झाली नाही. द्वेष करून पुढे जाता येत नाही. तुमची रेष मोठी करायची असेल, तर ब्राह्मणांची तुम्हाला मदत घेऊनच पुढे जावे लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश चितळे यांचा आदर्श सर्वांनी घ्यायला पाहिजे. केतकी चितळेचा तर आदर्श जयंत पाटील यांनीच घ्यायला पाहिजे, असा सल्लाही पडळकर यांनी जयंत पाटील यांना यावेळी दिला.