

सांगली : सांगली, कोल्हापूर, सातारासह सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे खंडपीठ तातडीने सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेमध्ये केली.
सांगली वकील संघटनेच्या कार्यालयाला जयंत पाटील यांनी नुकतीच भेट दिली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोल्हापूर खंडपीठाचा विषय मांडणार असल्याचे आश्वासन त्यांनी त्यावेळी दिले होते. त्यानुसार त्यांनी विधानसभेमध्ये बुधवारी हा प्रश्न मांडला. जयंत पाटील म्हणाले की सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांतील सर्व राजकीय पक्ष, संघटना, वकील संघटना या 38 वर्षे कोल्हापूर खंडपीठची मागणी करत आहेत. त्यासाठी अनेक आंदोलने झाली आहेत. या सहा जिल्ह्यातील सुमारे 80 हजार दावे उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असून ते दावे कोल्हापूर खंडपीठाकडे वर्ग झाल्यास पक्षकारांच्या वेळेची व पैशाची बचत होणार आहे. पीडितांना लवकर न्याय मिळण्यास मदत होणार आहे.
ते म्हणाले, 2022 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती दिवांकर दत्ता व तत्कालीन मुख्यमंत्री यांची संयुक्त बैठक होऊन कोल्हापूर येथे तातडीने खंडपीठ सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिली असून तसा शासन निर्णय झालेला आहे. तसेच खंडपीठ साठी निधीची कमतरता पडणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कोल्हापूर खंडपीठ साठी सध्या सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन व लोकांची मागणी विचार घेऊन कोल्हापूर येथे तातडीने खंडपीठ सुरू करावे.