

जत; पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यात विद्युत पंपाच्या कॉपर केबल चोरीस जाण्याचे प्रकार वाढत आहेत. सोमवारी (दि. २२) रात्री शेगाव व कोसारी येथे विद्युतपंपाची कॉपर केबल चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. अशा एकूण ४२ हजार किमतीच्या कॉपर केबलची चोरी झाली आहे. ही चोरी १८ मे व २० मे रोजी रात्री झाली आहे. याबाबतची फिर्याद दिनकर सिद्धगिरी गोसावी व रावसाहेब जगन्नाथ शिंदे (दोघेही रा.शेगाव) यांनी जत पोलिसात दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शेगाव तलाव क्र.२ च्या हद्दीतील दिनकर गोसावी यांच्या विद्युत पंपाची २५ हजार किमतीची ५१० मीटर कॉपर केबल चोरीस गेली आहे. तसेच कोसारी येथील साठवण तलाव हद्दीतील रावसाहेब शिंदे यांच्या शेती पंपाची १७ हजार किमतीची १०५० लांबीची कॉपर केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
दरम्यान, विहिरीवरील विद्युत मोटर, कॉपर केबल , विद्युत मोटरचे साहित्य चोरीस जाण्याचे प्रमाण गेल्या ६ महिन्यात वाढले आहे. २७ मार्च रोजी तिप्पेहळळी येथील चार शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारी, केबल, तार व स्टार्टर असे एकूण १ लाख ४० हजार १२५ मुद्देमाल चोरीस गेला होते. यापूर्वी अचकनहळ्ळी, उमदी, जत येथे ही अशा प्रकारच्या चोरी झाल्या आहेत. जत येथील कडीमळा येथे दिवसा विद्युत मोटरच्या केबल चोरून नेण्याची घटना घडली होती. यामुळे पोलिसांनी सखोल तपास करून शेतकऱ्यांचा मानसिक त्रास व आर्थिक नुकसान कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
या घटनेची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. कारण या केबल भंगारमध्ये विक्री केल्या जात आहेत असे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. अनेक तपास प्रलंबित आहेत. तरी पोलिसांनी सतर्क राहून चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.