जत : हुलजंतीत महालिंगराया व बिरोबा भेटीचा पालखी सोहळा; नैवेद्याचा मान जतच्या डफळे संस्थानिकांचा

जत : हुलजंतीत महालिंगराया व बिरोबा भेटीचा पालखी सोहळा; नैवेद्याचा मान जतच्या डफळे संस्थानिकांचा
Published on
Updated on

जत; विजय रूपनूर : महाराष्ट्रातील जागृत, श्री हालमत संप्रदायातील प्रसिद्ध देवस्थान म्हणून हुलजंती (ता. मंगळवेढा) महालिंगरायाची सर्वदूर ख्याती आहे. बिरोबा व महालिंगराया यांचा भेट सोहळा हा प्रसिद्ध आहे.हा भक्तीमय सोहळा ४ नोव्हेंबर पासून (शनिवार) पासून सुरू झाला आहे. या भाविकांचे लक्ष लागून राहिलेल्या मुंडास (ध्वज) हा सोहळा रविवारी होणार आहे. तर मुख्य दिवशी सोमवारी (दि.१३ रोजी) हून्नूरचा श्री बिरोबा व श्री महालिंगराया या गुरु-शिष्यांच्या भेटीचा पालखी सोहळा होणार आहे.

या सोहळ्यासाठी महाराष्ट्र-आंध्रप्रदेश, कर्नाटकातील लाखोच्या संख्येने भक्तगण येतात. हा दिव्य सोहळा 'याचि देही याचि डोळा' असा लाखों भक्तगण अनुभवणार आहे.महालिंगरायाला मुख्य दिवशी नैवेद्याचा मान जतच्या डफळे संस्थानिकांचा असतो. नुकतीच पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरुदेवाची यात्रा पार पडली आहे. त्यानंतर हा भेट सोहळा लगेचच पार पाडत असतो.

बिरोबा व महालिंगराया, या गुरु-शिष्यांच्या पालखीचा मुख्य भेटीचा सोहळा दिपावाली पाडव्याच्या पूर्वसंध्येला (दि.१३ सोमवार) रोजी दुपारी ३ वाजता संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या आदल्या दिवशी रात्री १२ वाजता मुंडास बांधले जाते. मध्यान रात्री कैलासमधून शंकर-पार्वती पार्वती येतात अन् महालिंगराया मंदिराच्या पंच शिखराला (मुंडास) आहेर करतात. यावेळी देवाची मुक भाकणूक झाली असेही मानतात. आशी धारणा भक्तांची पूर्वीपासून आहे. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होणार आहे. तदनंतर दुसऱ्या दिवशी गुरु-शिष्यांच्या पालखी भेटीचा सोहळा देवस्थानच्या बाजूने वाहत असलेल्या हालहाळ ओढ्यात होणार आहे.

गुरुशिष्यांची पालखी भेट झाल्यानंतर नगारा व ढोल कैताळ वाजवीत, अनेक पालख्या महालिंगराया पालखीची भेट घेतात. यावेळी 'महालिंगराया-बिरोबाच्या नावानं चांगभलं' च्या गजरात आकाशात भंडारा, लोकर व खोबरे उधळण्यात होते. नगारा व ढोल यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून जातो. हा पालखी भेट सोहळा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू व गोवा राज्यातून दाखल झालेल्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. या गुरू शिष्याच्या नयनरम्य भेट सोहळ्या अगोदर सात पालख्यांचा भेटीचा मान आहे. सोन्याळ (ता. जत) येथील विठुराया, उटगी येथील भरमदेव, शिरडोन येथील शिलवती , बिरोबा यासह अन्य देवाच्या पालख्यांचा भेट सोहळा होत आहे. हा भक्तिमय सोहळा आठवडाभर सुरू असतो.

महालिंगराया या वीर (सिद्ध)पुरुषाने बारामती येथे मासाळ घराण्यात जन्म घेतला. महालिंगरायानी अनेक भक्तांच्या लीलया चमत्कार करून दाखवले. दुष्टांवर प्रहार, संहार केला. सज्जनांचे रक्षण केले. समाज जागृती केली. गुरु बिरोबा यांना गुरुस्थानी ठेवून सेवा कशी करावी, हे महालिंगरायानी आपल्या भक्तीतून दाखवून दिले आहे. मंगळवेढापासून दक्षिणेला २२ किलोमीटर अंतरावर हुलजंती (दक्षिण काशी )म्हणून ओळखले जाते. या मंदिरासमोरूनच मंगळवेढा उमदी विजापूर राष्ट्रीय महामार्ग जातो यामुळे प्रवासांची चांगली सोय झाली आहे. या गावास धार्मिक महत्त्व देवस्थानांमुळे प्राप्त झाले आहे. बाराव्या शतकातील दगडी व कोरीव आकर्षक मंदिर बांधकाम आहे. स्वागत कमानीचे काम पूर्णत्वास येत आहे. सहाजिकच या ठिकाणी गेल्यावर थोडा वेळ थांबल्याशिवाय पुढे जाता येत नाही.

हुलजंती – महालिंगराया व जत धार्मिक संबंध

महालिंगराया हुलजंती येथील मुख्य यात्रेच्या दिवशी देवाच्या नैवेद्याचा मान जत येथील डफळे संस्थानिक राजघराण्याला आहे. तो आज ही पूर्वापार पारंपारिक पद्धतीने जपला जात आहे. महालिंगरायाचे गुरु बिरोबा देव हन्नूर (मंगळवेढा) येथील असून पूर्वी हे गाव जतच्या डफळे संस्थानिकात होते. आज ही दोन्ही देवस्थान या ठिकाणी डफळे संस्थानिकातील राजेंना मान दिला जातो. हन्नुर हे जत तालुक्यातील उमदीपासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर देवस्थान आहे. जत तालुक्यातील उटगी येथील भरमदेव, सोन्याळ येथील विठुराया या देवांच्या पालख्या या भेटी सोहळ्यासाठी मानाच्या असतात. त्यामुळे धार्मिक संबंध मोठ्या प्रमाणात आजही जोपासले जात आहे.

हालमत धर्मांची" काशी (भू कैलास)

महालिंगरायाने शिगीमठ (शिरडोण) येथे आपल्या गुरुचे मठही स्थापन केला. त्या मठात श्री महालिंगरायानी अनंतकाळ गुरुची भक्ती केली. त्याच काळात त्यानी लिंबाळ डोंगरातील वाघिणीचे दूध स्वतःहुन काढून आणून गुरूस अर्पण केले होते. त्या वाघिणीच्या स्मरणार्थ जिंती नारायणपुर या गावाला "हुलजंती" असे नांव महालिंगरायाने ठेवले. हुलीजयंती या नावावरुनच पुढे हुलजंती हे नांव प्रचारात आले. तेच सध्याचे "हालमत धर्मांचे" काशी होय. तसेच हुलजंतीला भू कैलास असे म्हणतात, अशी आख्यायिका आहे…..

यंदाचा नयनरम्य पालखी भेट सोहळा

  • शनिवारी दि. ४ नोव्हेंबर रोजी हून्नूर येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री बिरोबा व महालिंगराया पालखी भेट संपन्न.
  • शनिवारी दि.११ नोव्हेंबर रोजी शिरढोण बिरोबा शिलवंती भेट.
  • रविवारी दि.१२ नोव्हेंबर रोजी मडी जकराया भेट.. रविवारी दि.१२ नोव्हेंबर रोजी मुंडास (ध्वज).
  • सोमवार दि. १३ नोव्हेंबर रोजी हुलजंती महालिंगराया व बिरोबा यांची पालखी भेट सोहळा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news