

जत : जतपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निगडी-जत रोडलगतच्या व्हनखंडे वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम 65 हजार आणि सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 3 लाख 49 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी रात्री घडली असाव, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
याप्रकरणी प्रमोद रोहिदास व्हनखंडे यांनी जत पोलिसात फिर्याद दिली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले, पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी आणि ठसेतज्ज्ञ यांनी भेट देऊन पंचनामा केला.
शनिवारी सायंकाळी व्हनखंडे हे आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. दरम्यान, रविवारी सकाळी व्हनखंडे यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे शेजारी राहणाऱ्या भावाच्या लक्षात आले. त्यांनी प्रमोद यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी पाहिले असता, घरातील कपाट उघडून चोरट्यांनी 65 हजार रुपये रोख रक्कम, साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने, पैंजण, घड्याळ व अन्य मौल्यवान वस्तू असा सुमारे 3 लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे आढळले.