

जत : ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’, अशा जल्लोषात तालुक्यातील गणेश विसर्जन सोहळा यंदा मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला. तालुक्यातील सर्वच गावांमध्ये इको-फ्रेंडली व पर्यावरणपूरक मूर्तींचे विसर्जन यंदाचे वैशिष्ट्य ठरले. काही ठिकाणी पर्यायी कुंडांमध्ये उत्स्फूर्तपणे मूर्ती विसर्जन करून तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्यास सहकार्य केले. ऐतिहासिक परंपरा असलेल्या येळवीच्या ओंकार स्वरूपा गणेशोत्सव मंडळाने गणरायाचे वाजत गाजत व पारंपरिक पद्धतीने विसर्जन केले.
अनेक ठिकाणी पारंपरिक ढोल-ताशांच्या निनादात, झांजपथकांच्या तालात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला. पोलिस प्रशासन, नगरपरिषद व स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या नियोजनामुळे संपूर्ण विसर्जन सोहळा शांततेत, शिस्तबद्ध व सुरक्षिततेत पार पडला.
अघोरी शो ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू : बुधवारी मिरवणूक व मुख्य चौकात अघोरी शो पाहण्यासाठी गर्दी उसळली. विशेषतः महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘बम बम भोले, जय महाकाल’च्या गजरात अघोरी कलाकारांनी नृत्य सादर करत मिरवणुकीत रंगत आणली.