

जत : जत एसटी स्थानक परिसरात भरधाव एसटी बसच्या धडकेत ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, दि. ६ ऑगस्ट रोजी रात्री घडली. याप्रकरणी जत पोलिसांनी बस चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपळावी (ता. तासगाव) येथील शिवाजी बाळासाहेब देसाई (वय ८०) हे जत एसटी स्थानकात आले होते. रात्री सुमारे ९:३० वाजण्याच्या सुमारास स्थानकातील वर्कशॉपच्या प्रवेशद्वाराजवळ ते उभे असताना, एमएच १० डीटी ३२७१ क्रमांकाची एसटी बस, चालक नागेश महादेव माळी (रा. कडीमळा, ता. जत) याने भरधाव, हयगयीने व निष्काळजीपणे चालवून देसाई यांना समोरून जोरदार धडक दिली.
या अपघातात शिवाजी देसाई गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचे पुत्र दिनकर शिवाजी देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जत पोलिस ठाण्यात शुक्रवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.