

जत : शहरात मोकाट कुत्र्याने धुमाकूळ घालत नगरसेवकासह नऊ नागरिकांना चावा घेतला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जखमींवर जत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, काहीजणांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
या कुत्र्याच्या हल्ल्यात नगरसेवक तथा काँग्रेसचे गटनेते भूपेंद्र कांबळे यांच्यासह दिनेश सुभाष मानवर, श्रद्धा मदनराव माने-पाटील, शारदा आवटी, रमेश साबळे, फारुख मुल्ला, सुखदेव हिप्परकर, प्रतीक वळसंग व मुनेवार शेख हे जखमी झाले. काहींच्या जखमा खोलवर असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. शहरातील आंबेडकरनगर, महाराणा प्रताप चौक व सातारा रोड परिसरात या पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांवर अचानक हल्ले केले. कुत्रे अचानक नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
हा कुत्रा पिसाळलेला असल्याचे लक्षात आल्यानंतर काही नागरिकांनी कुत्र्याचा पाठलाग केला. तसेच आरडाओरड करून इतर नागरिकांना सावध केले. आंबेडकरनगर परिसरात एका लहान मुलावर हा कुत्रा झडप घालण्याचा प्रयत्न करत असताना नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांनी प्रसंगावधान राखत त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी कुत्र्याने त्यांच्या पायाला चावा घेतल्याने तेही जखमी झाले.
या घटनेनंतर नागरिकांमधून संतप्त पडसाद उमटले. या पिसाळलेल्या व मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली.
मोकाट जनावरांचा धुमाकूळ
जत शहरात मोकाट प्राण्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. जत बसस्थानक परिसर, मार्केट यार्ड, सातारा रोड, मटण मार्केट गल्ली, तसेच घनकचरा प्रकल्प परिसरात मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची घोळकी आढळून येतात. ही कुत्री कधी कोणावर हल्ला करतील, हे सांगता येत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नगरपालिका निवडणुकांपूर्वी प्रशासनाच्या कालावधीतही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.