

जत : राज्यातील नगरपरिषद क्षेत्रातील मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत जत नगरपरिषदेसाठी 1 मेगावॅट क्षमतेच्या पारेषण संलग्न सौरऊर्जा प्रकल्पास तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 6 कोटी 31 लाख 65 हजार 694 रुपये खर्चास मान्यता मिळाली असून, यामुळे जत नगरपरिषदेचा वीजखर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून नववर्षाच्या प्रारंभी मंजूर झालेल्या पर्यावरण प्रकल्पाचे तालुक्यातून स्वागत होत आहे.
महाऊर्जा विभागाच्या मार्गदर्शनाखाली व शासन निर्णयांच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्रकल्प अहवालास तांत्रिक मान्यता देण्यात आली असून, नगरपरिषदेने आवश्यक ती तांत्रिक मंजुरी फी भरली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संबंधित सौरऊर्जा प्रकल्पाची तांत्रिक तपासणी करण्यात येणार असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुरवठादारास देयक अदा करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे दर महिन्याला नगरपरिषदेच्या मूलभूत दिवाबत्ती सोयी-सुविधांना सुमारे 18 लाख रुपये खर्च होत होता. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास सदरच्या खर्चाची बचत होणार आहे. पर्यावरण प्रकल्पामुळे प्रदूषण होणार नाही. भविष्यात शहरात सौर प्रकल्प आधारित शहर याकरिता आमदार पडळकर यांच्या माध्यमातून विशेष असे प्रयत्न सुरू आहेत.