

जत शहर : जत शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या 77 कोटी 94 लाख रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. ठेकेदाराच्या मनमानी कामाच्या पद्धतीमुळे ठिकठिकाणी खोदलेल्या चरींनी आणि रस्त्यांवर टाकलेल्या मुरूम-मातीने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील प्रमुख मार्गांवर तयार झालेल्या उंच मातीच्या बांधांमुळे पादचारी आणि वाहनचालक त्रस्त होत आहे. दैनंदिन हालचालींची वाट लागली आहे.
जत शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटावी यासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही महत्त्वपूर्ण योजना आणली. याआधी माजी आमदार विक्रम सावंत यांनी देखील मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केला होता, परंतु मंजुरी मिळू शकली नव्हती. मंजुरी मिळवून देत पडळकर यांनी हे काम प्रत्यक्षात आणले असून त्यांचा यापूर्वी नागरी सत्कारही करण्यात आला होता.
या योजनेअंतर्गत शहरात 194 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. एकूण पाच पाणीटाक्यांमार्फत अंदाजे 18 लाख 50 हजार लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण होणार आहे. सध्याची शहराची लोकसंख्या साधारण 70 हजार असून दररोज 94 लाख 50 हजार लिटर पाण्याची गरज भासते. प्रत्येक नागरिकाला 135 लिटरप्रमाणे पाणीपुरवठा करण्याची योजना आहे.
मात्र, प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांच्या मनात अनेक शंका निर्माण होत आहेत. कामाचे ठेकेदार रस्त्यांवर कोणताही प्लॅन, नकाशे किंवा माहितीफलक न लावता खोदकाम करीत असल्याने पारदर्शकतेचा अभाव दिसून येत आहे. पाईपलाईन जमिनीखाली सहा ते सात फूट खोल टाकली जात असल्याने वापरलेल्या पाईपचा दर्जा निकृष्ट असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
सिमेंट काँक्रिट आणि डांबरी रस्त्यांचे खोदकाम करूनही त्यांची दुरुस्ती न करता अनेक ठिकाणी खोदकाम अर्धवट सोडून दिले आहे. खोदलेल्या चरीतील मुरूम आणि माती बाजूला हलवून रस्ता पूर्ववत करण्याऐवजी रस्त्याच्या कडेला माती टाकून ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे वाहतूक धोकादायक झाली आहे. या सर्व प्रकारामुळे नगरपरिषदेला मंजूर करण्यात आलेल्या निधीचा वापर नेमका कसा होत आहे, असा प्रश्नही नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे.
योजनेअंतर्गत काही ठिकाणी इस्टेट डेव्हलपर्सनी तयार केलेल्या बिगरशेती प्लॉटमध्येही पाईप टाकल्याचे निदर्शनास आले असून नियमानुसार त्यांना स्वतंत्र पाणीटाकी व जलसुविधा उभारणे बंधनकारक असतानाही या प्रक्रियेला वळसा घातल्याची चर्चा रंगली आहे.
एकूणच ठेकेदाराच्या हलगर्जी आणि मनमानी कामकाजामुळे जत शहरातील सर्वच रस्त्यांची पार वाट लागली आहे. नागरिकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत, ज्या रस्त्यांचे नुकसान केले आहे, ते पूर्ववत स्वरूपात दुरुस्त करावेत, अन्यथा रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा स्पष्ट इशारा ठेकेदाराला दिला आहे.