

जत : जत येथे अवैध शस्त्रांच्या विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे 6 पिस्टल व 20 जिवंत काडतुसे, असा 3 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई दि. 8 नोव्हेंबररोजी विजापूर रोडवरील मार्केट यार्डसमोर करण्यात आली.
पोलिसांनी मारुती ऊर्फ बबलू श्रीमंत गलांडे (वय 30, रा. विठ्ठलनगर, गल्ली क्रमांक 4, जत) व आकाश सुरेश हजारे (वय 27, रा. घुट्टेवाडी, पाहुणेवाडी, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद सुभाष बाबू काळेल यांनी पोलिसात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जत पोलिस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून बबलू गलांडे या संशयितास ताब्यात घेतले. त्याची चौकशी करून तपासणी केली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल मिळाले. त्यास अटक करून तपास केल्यावर त्याने आणखी पिस्टल व काडतुसे लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्याच्याकडे एकूण 3 पिस्टल व 8 काडतुसे मिळाली. पुढील तपासात त्याचा साथीदार आकाश सुरेश हजारे (रा. घुट्टेवाडी, ता. बारामती) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 3 लाख 46 हजार रुपये किमतीचे 3 पिस्टल व 12 काडतुसे जप्त करण्यात आली.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर, उपनिरीक्षक व्ही. व्ही. पोटे, उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अच्युतराव माने, विक्रम घोदे, सागर कारंडे यांच्या पथकाने केली.