

सांगली ः जिल्ह्यात जल जीवन मिशनची कामे करणार्या ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची बिले थकली आहेत. मात्र कर्मचार्यांनादेखील वेतन मिळाले नाही. गेल्या चार महिन्यांपासून कंत्राटी कर्मचार्यांना मानधन मिळालेले नाही, परिणामी त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची चिन्हे आहेत.
या योजनेतील गट संसाधन केंद्र कर्मचारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर कंत्राटी कर्मचार्यांचे मानधन गेल्या चार महिन्यांपासून मानधन थकीत आहे. महाराष्ट्रभरातील जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन या केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणारे कंत्राटी कर्मचारी मानधनासाठी पाठपुरावा करीत आहेत. मात्र, जुलैपासून एकही रुपया मिळालेला नाही. त्यांनी राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाशी संपर्क साधला असता, केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झालेला नसल्याने मानधन देणे शक्य नाही, अशी उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे कर्मचार्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचार्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना तसेच प्रधान सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांना कर्मचार्यांनी निवेदने दिली आहेत. चार महिन्यांचे थकीत मानधन तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे. मानधन मिळाले नाही, तर दिवाळी सणाच्या काळात कर्मचार्यांच्या घरात अंधारच असणार आहे.
जिल्हा व तालुका स्तरावर हे कर्मचारी अत्यल्प मानधनावर काम करतात. त्यातून घरखर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्यावरील खर्च भागवावा लागतो. अल्प मानधनात हा खर्च भागत नसल्याने कर्मचार्यांवर मानसिक ताण आहे. त्यातच आता चार-चार महिने मानधन थकल्याने ऐन सणासुदीत ते हैराण झाले आहेत. गणेशोत्सव आणि दसर्यानंतर आता दिवाळीही वेतनाविनाच जाण्याची चिन्हे आहेत.