सांगली : पुढारी वृत्तसेवा
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील काही व्यापारी बाहेरच्या बाहेर गुळाचा व्यापार करीत आहेत. त्यामुळे येथील यार्डात गुळाची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्याचा फटका हमालांना बसत असल्याने ते आक्रमक झाले आहेत. संबंधित व्यापार्यांचे गुळाचे सौदे बंद पाडण्यात आले. बाजार समितीच्या सेससह हमालांना आर्थिक फटका बसत असल्याने गुळाच्या व्यापाराबाबत मार्ग काढण्यात यावा अन्यथा बेमुदत बंदचा इशारा हमाल पंचायतच्यावतीने देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुळाचे उत्पादन होते. कोल्हापूरच्या बरोबरीने सांगली बाजार समितीमध्येही गुळाची आवक होत होती. यंदा मात्र येथील गूळ उत्पादन व्यवसाय कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सांगली बाजार समितीमध्ये गुळाची आवक कमी होऊ लागली आहे. काही खरेदीदार व अडते सांगलीत परवाना असताना गुळाचा व्यापार परस्पर बाहेर करतात. याबाबतचा आक्षेप घेत याविरोधात बेमुदत बंदचा इशारा हमाल पंचायततर्फे देण्यात आला होता. त्यावर समितीने यार्डाबाहेर व्यापार करू नये, अन्यथा कारवाई करू, असा इशारा दिला होता. तोडगा न निघाल्याने संबंधित व्यापार्यांच्या गुळाचे सौदे हमालांनी गुरुवारी बंद पाडले.
गुळाचे सौदे सुरू राहण्यासाठी सरकार, बाजार समितीने वेळीच उपाययोजना करण्याची मागणी हमालांनी केली. गुळाच्या व्यापाराबाबत तत्काळ तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा हमाल पंचायतच्यावतीने देण्यात आला. यावेळी हमाल नेते विकास मगदूम, बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर यांच्यासह हमाल आंदोलनात सहभागी झाले होते.