

आटपाडी : आटपाडी येथे चक्क ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाचशेच्या नोटा वाहत आल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. या नोटा गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. या नोटा कुठून आल्या, याबाबत कोणतीच माहिती मिळाली नाही. ही रक्कम लाखोंच्या घरात असल्याचे समजते.
शहरातील अंबाबाई मंदिर परिसरात गदिमा पार्कसमोर शुक ओढापात्रात या नोटा आढळल्या. शनिवारी सकाळी विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयात जाताना त्यांना ओढ्यात पाचशेच्या नोटा वाहताना दिसल्या. विद्यार्थ्यांनी पाण्यात जाऊन पाहिले असता, त्यांना पाचशेच्या अनेक नोटा सापडल्या. शनिवारी आटपाडीत तालुक्याचा आठवडी बाजार भरतो. रस्त्यावर मोठी गर्दी असते. ग्राहक, व्यापारी येथे मोठ्या संख्येने जमले होते. त्यांनाही पाण्यात नोटा असल्याचे समजताच अनेकांनी ओढ्याच्या पात्रात उतरून पाचशेच्या अनेक नोटा गोळा केल्या.
ओढ्यात नोटा सापडत असल्याचे सर्वत्र समजताच गर्दी वाढत गेली; पण हे पैसे कोठून आले आणि फक्त येथेच कसे सापडले, याबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही. प्लास्टिकच्या पिशवीत हे पैसे असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, नेमकी माहिती कोणाकडेच नव्हती. या नोटा नेमक्या कुठून आल्या, याचा पोलिस शोध घेत आहेत.