

इस्लामपूर : वाढती लोकसंख्या, अनधिकृत नळ कनेक्शन, जुन्या पाईपलाईनमुळे वारंवार होणारी पाण्याची गळती, कमी साठवण क्षमता यामुळे शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या वाढू लागली आहे. कमी दाबाने तसेच अनियमीत व अपुर्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. शहराला तातडीने सुधारित पाणी योजनेची गरज आहे. शासनाने अमृत 2 योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या 123 कोटींच्या पाणी योजनेला वित्त विभागाची अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही.
शहराची पाणी योजना 23 वर्षांची जुनी आहे. त्यामुळे या योजनेच्या पाईप वारंवार लिकेज होऊन पाणी गळती वाढत चालली आहे. शिवाय वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा या सर्वांचा परिणाम पाणीपुरवठ्यावरही होत आहे. सध्या शहराची लोकसंख्या लाखाच्या घरात पोहोचली आहे. सध्या शहरात सकाळी व सायंकाळी पाणीपुरवठा होत आहे. काही तांत्रिक अडचण आल्यास यामध्ये खंड पडतो. उपनगरे व चढावरील ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत.
शहरात सध्या 14 हजार 548 घरगुती तर 231 शासकीय, 421 व्यावसायिक अशी 15 हजार 200 नळ कनेक्शन आहेत. तर 500 हून अधिक बोगस नळ कनेक्शन असल्याचा अंदाज आहे. शहराला आजमितीला 12.5 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात फारच कमी पाणी पुरवठा होत आहे. त्यातच पाणी साठवण क्षमताही कमी आहे. 7 पाण्याच्या टाक्यांपैकी 3 टाक्यांची मुदत संपलेली आहे. शहराला 16 पाण्याच्या टाक्यांची गरज आहे. सध्या 123 कोटींच्या नवीन पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली आहे. मात्र तो निधी अद्याप मिळालेला नाही. या योजनेचे काम मार्गी लागेपर्यंत नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणार्या शहराच्या पाणी पुरवठा योजनेचा कोट्यवधी रुपयांचा भार पालिकेवर आहे. योजनेवरील कर्मचार्यांच्या पगारावर वर्षाला सुमारे दीड कोटी, देखभाल दुरुस्तीवर 25 लाख, वीज बिलावर 3 कोटी, तुरटी , पावडर व इतर साहित्य खरेदीवर 10 लाख असा सुमारे 6 कोटी 50 लाख खर्च होत आहे. तर पाणीपट्टीच्या माध्यमातून केवळ 3 कोटीच मिळतात. पाणीपट्टीत सन 2006 सालापासून वाढ झालेली नाही.