

इस्लामपूर : शहरातील अरुंद रस्ते व त्यावरील व्यापार्यांची अतिक्रमणे यामुळे होणार्या वाहतूक कोंडीकडे नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष घातले आहे. ही अतिक्रमणे व्यापार्यांनी स्वत:हून काढून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन नूतन मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.
जे व्यापारी अतिक्रमणे काढणार नाहीत, ती अतिक्रमणे नगरपालिका स्वत:हून काढेल, असा इशाराही मुख्याधिकार्यांनी दिला आहे. शहरातील प्रमुख मार्गावर असणारे अडथळे काढून रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारण्याची मोहीम पालिकेने राबविली आहे.
या पट्ट्यांच्या आतच दुचाकी पार्किंग करण्याचे सूचित केले जात आहे. त्याचबरोबर ज्या व्यापार्यांनी दुकानाचे फलक, साहित्य तसेच मोठ्या जाळ्या रस्त्यावर ठेवल्या आहेत, त्या काढून घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
जे व्यापारी हे फलक, साहित्य काढून घेणार नाहीत, ते साहित्य पालिका स्वत:हून काढून नेईल, असा इशाराही देण्यात आला आहे. अतिक्रमणे काढून शहरातील सर्व रस्ते मोकळे होईपर्यंत ही मोहीम चालूच राहील, असे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.