

इस्लामपूर : केंद्रात-राज्यामध्ये भाजपप्रणित सत्ता स्थापन झाल्यापासून राज्यातील काही लक्षवेधी शहरांची नावे बदलण्यात आली. त्याच धर्तीवर आता गेल्या 40-50 वर्षांपासून चर्चेत असलेल्या इस्लामपूरचे नाव देखील ईश्वरपूर होण्याची शासनस्तरावरील कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी शहराचे नामकरण ईश्वरपूर करावे; अशी मागणी चार - पाच दशकांपूर्वी केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची डिसेंबर 1986 मध्ये इस्लामपूर येथील यल्लमा चौकात जाहीर सभा झाली होती. या सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूर नव्हे तर हे ईश्वरपूर; असा उल्लेख प्रथमच जाहीर व्यासपीठावरून केला होता. तत्कालीन शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. दि. बा. पाटील हे या सभेचे आयोजक होते. कामगार सेनेचे तत्कालीन प्रमुख दत्ताजी साळवी यांच्यासह शिवसेनेचे तत्कालीन नेते या सभेस उपस्थित होते. या घटनेला आता 40 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतर काही हिंदू समाजबांधव, संघटनांनी देखील वेळोवेळी ही मागणी शासन स्तरावरून रेटण्याचा प्रयत्न केला. गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी जिल्हा शिवसेनाप्रमुख आनंदराव पवार व त्यांच्या सहकार्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर ही मागणी लावून धरली, सह्यांची मोहीम घेतली. याचदरम्यान या मागणीला काहीसा विरोध देखील जाहीररित्या करण्यात आला. पण हा विरोध न जुमानता येथील संबंधितांनी ही आग्रही मागणी पुढे नेली. गेल्या आठवड्यात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून यासंदर्भात निवेदन दिले.
दोन-तीन महिन्यात यासंदर्भातील शासनस्तरावरील कार्यवाही पूर्ण झाली की शहराचे नामांतर ईश्वरपूर होईल. त्यानंतर मग ईश्वरपूर नगरपरिषद, ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ यासह तालुका, जिल्हा, अशा सर्वच शासकीय, निमशासकीय सर्व स्वरूपाच्या व्यवसाय, उद्योग, संस्था, स्तरावर ईश्वरपूर हे नाव लागेल.
इस्लामपूर शहराला उरुण इस्लामपूर असेही पूर्वीपासून संबोधले जाते. उरूण म्हणजे शहरातील साधारणतः आष्टा नाका, पोस्ट ऑफिस, जुना बहे नाका असा या मुख्य रस्त्याच्या पूर्वेकडील भाग असेही सांगितले जाते. उरूणावती या देवीच्या नावावरून उरूण हे नाव पडले असावे असे सांगितले जाते. शहराच्या या नावाच्या इतिहासाबद्दल मध्यंतरी उरूण परिसरातील ह.भ.प. रघुनाथ आप्पा गुरुजी यांनी देखील काही लेखन केले होते.