Sadabhau Khot| दर जाहीर करा, अन्यथा रस्त्यावर उतरू

सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली ईश्वरपुरात ‘रयत क्रांती’चा मशाल मोर्चा
Sadabhau Khot
सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली ईश्वरपुरात ‘रयत क्रांती’चा मशाल मोर्चा
Published on: 
Updated on: 

ईश्वरपूर : सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी चालू गळीत हंगामाचा ऊसदर जाहीर न करताच गाळप सुरू केल्याच्या निषेधार्थ रयत क्रांती संघटनेच्या वतीने शुक्रवारी आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शहरात मशाल मोर्चा काढण्यात आला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

ईश्वरपूर पंचायत समिती कार्यालयासमोरून सायंकाळी सात वाजता मोर्चाला सुरुवात झाली. हाती मशाली घेऊन निघालेला मोर्चा गांधी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला, तेथे मोर्चाची सांगता झाली.यावेळी आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात कारखानदारांनी प्रतिटन ३,९०० रुपये, अतिरिक्त १०० रुपये आणि साखरेचा दर वाढल्यास आणखी २०० रुपये देण्याची भूमिका जाहीर केली आहे. मात्र, सांगली जिल्ह्यात कारखानदारांनी अद्याप दर जाहीर केला नाही. शेतकऱ्यांनी वर्षभर कष्ट करायचे व कारखानदारांनी दर न ठरवताच गाळप करायचे, हे सहन केले जाणार नाही.

कारखानदारांनी तातडीने ऊसदर जाहीर करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. येत्या रविवारी (दि. ८) आष्टा येथेही मशाल मोर्चा काढण्यात येणार असून, त्यानंतरही दर जाहीर न झाल्यास शेतकऱ्यांसोबत 'काळी दिवाळी' साजरी करण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.